जळगाव : खासदार व आमदारांनी आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला महापालिका निवडणुकीत उभे करू नये, असा निर्णय भाजपने घेतल्याने जळगावच्या राजकारणात चर्चांना वेग आला आहे. जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी माजी महापौर सीमा भोळे, मुलगा विशाल भोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, भाजपच्या उमेदवार यादीत केवळ विशाल भोळे यांचेच नाव आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट भूमिकेनंतर दोन्ही माय-लेक पक्षाच्या धोरणानुसार आपला अर्ज मागे घेणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. माघारीच्या दिवशी यावर अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, पक्षनेतृत्वव नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
चोपडा येथील शिंदेसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या कुटुंबातील मुलगा, मुलगी तसेच पुतण्या अशा तिघांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे भाजपने घेतलेल्या निर्णयाचा मित्रपक्षांवर काय परिणाम होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
परिवहनमंत्री सरनाईक आणि खा. म्हस्के यांच्या मुलांचे तिकीट कापले; समर्थकांनी व्यक्त केली नाराजी -शिंदेसेनेचे नेते व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रभाग क्रमांक १४-अ मधून इच्छुक असलेले पुत्र माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक आणि खा. नरेश म्हस्के यांचे प्रभाग क्रमांक १९-ड आनंदनगरमधून इच्छुक असलेले पुत्र आशुतोष म्हस्के यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी उमेदवारी नाकारली. याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी मंगळवारी आनंदाश्रम गाठून संताप व्यक्त केला.
मागील निवडणुकीत पूर्वेश सरनाईक हे १४-अ मधून निवडून आले होते; परंतु पाच वर्षांत ते प्रभागात फिरकलेच नसल्याची ओरड होती. तसेच प्रभाग आरक्षण जाहीर झाले तेव्हाच त्यांची संधी गेल्याचे दिसून आले. अखेर शिंदेसेनेकडून दुसऱ्याला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पूर्वेश यांनी भावनिक पोस्ट टाकून निवडणूक न लढविण्याचा सहा महिन्यांपूर्वीच आपण निर्णय घेतला होता, असे जाहीर केले. ‘राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वहीं बनेगा जो हकदार होगा’ असेही त्यांनी म्हटले आहे.