कोरोनामुळे हद्दवाढीतील नागरिक सुविधांपासून क्वॉरण्टाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:12 IST2021-07-01T04:12:41+5:302021-07-01T04:12:41+5:30
रावेर : शहरालगतच्या २९ नागरी वसाहतींना हद्दवाढ होऊन तब्बल दोन वर्ष लोटली असली तरी कोरोनाच्या साथरोगामुळे या हद्दवाढीचा लाभ ...

कोरोनामुळे हद्दवाढीतील नागरिक सुविधांपासून क्वॉरण्टाइन
रावेर : शहरालगतच्या २९ नागरी वसाहतींना हद्दवाढ होऊन तब्बल दोन वर्ष लोटली असली तरी कोरोनाच्या साथरोगामुळे या हद्दवाढीचा लाभ भेटलेल्या शहरवासीयांना चक्क दोन वर्षांपासून नागरी पायाभूत सुविधांपासून क्वॉरण्टाइन व्हावे लागत आहे. सव्वादोन कोटी रुपयांचा पथदिवे व ३५ कोटींची संपूर्ण शहराची नवीन पाणीपुरवठा योजना कोरोनाच्या लॉकडाऊनपासून धूळ खात पडून असल्याने तब्बल ४० वर्षे शहर हद्दवाढीसाठी प्रतीक्षा करणार्या संबंधित रहिवाशांना आणखी दोन वर्षांपासून नागरी विकासाच्या योजनांपासून दुरापास्त व्हावे लागले असल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
रावेर शहराला तब्बल ८३ वर्षांनंतर ४.८५ चौरस किमी क्षेत्रफळाची शहर हद्दवाढ १४ नोव्हेंबर २०१९ रोजी लाभली होती. हद्दवाढ झाल्याने तब्बल ४० वर्षांपासून शहराच्या दाही दिशांना शहराचे उसने नागरिकत्व घेऊन पाणी, वीज, रस्ते, गटारी या पायाभूत सुविधांच्या वनवासात जीवन व्यतित करणार्या शहरवासीयांना हद्दवाढ झाल्याने आपण खर्या अर्थाने शहरवासीय झाल्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
मात्र, नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न..! जणूकाही याच उक्तीप्रमाणे हद्दवाढ झालेल्या शहरवासीयांच्या मानगुटीवर कोरोनाच्या साथरोगाची भूत येऊन बसले. शहर हद्दवाढ झालेले २९ नागरी वसाहतींसह नवीन हद्दवाढ झालेल्या भागासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाद्वारे पालिकेने ३५ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना शहरासाठी प्रस्तावित केली आहे. हद्दवाढ झालेल्या भागाचे विद्युतीकरण व पथदिव्यांसाठी सव्वादोन कोटी रुपयांची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
मात्र, कोरोनाच्या साथरोगामुळे नवीन विकास योजनांना गत दोन वर्षांपासून खीळ बसली असल्याने तांत्रिक मंजुरीसाठी दोन्ही प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात आहेत. कोरोनाची पहिली लाट गेली, दुसरी लाट आली. दुसरी लाट गेली तरी तिसर्या लाटेची चाहुल लागल्याने पुन्हा कठोर निर्बंधात वाढ झाली आहे. त्यामुळे कोविडच्या किती लाटा येतील अन् किती जातील, हे सांगणे व समजणे अवघड असले तरी शहर हद्दवाढ झालेल्या नागरिकांना मात्र कोविडच्या लाटा कधी संपतील आणि या मूलभूत सुविधांअभावी होणाऱ्या मरण यातनांमधून कधी मुक्ती मिळेल, याकडे लक्ष लागले आहे.
सद्य:स्थितीत पावसाळ्यात अंतर्गत रस्त्यांअभावी चिखलाचे साम्राज्य, सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने घाणीचे साम्राज्य व पथदिव्यांअभावी अंधाराचे साम्राज्य यामुळे शहर हद्दवाढीतील जनता मेटाकुटीला आली आहे.
शहर हद्दवाढीनंतर या नागरिकांना शहराच्या नागरिकत्वासाठी हक्काचा लोकप्रतिनिधी मिळावा म्हणून दोन प्रभागाची निर्मिती करून चार ना. मा. प्रवर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षणही घोषित करण्यात आले होते. मात्र त्या निवडणुकीलाही कोविडचीच मांजर आडवी गेल्याने संबंधित पालिकेचे दोन-चार महिन्यांसाठी सौभाग्य लाभणाऱ्या नगरसेवकपदाची निवडणूक लांबणीवर पडल्याचे दुर्भाग्य ठरले आहे. परिणामी आता न.पा. सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजण्याची प्रतीक्षा शहर हद्दवाढीतील नागरिकांना आहे. शहर हद्दवाढ झालेल्या भागाच्या सर्वांगीण विकासाची आस लागली आहे.
हद्दवाढीच्या विकासाला कोरोनाने नाडले; पण विकासाचे स्वप्न अपूर्ण सोडून अनेकांनी मृत्यूला कवटाळले..
शहराची हद्दवाढ होऊन दीड वर्ष लोटले असले तरी कोरोनामुळे या हद्दवाढीतील रहिवाशांना अद्याप वीज, पाणी, रस्ते, गटारी या मूलभूत सुविधांचा अद्याप विकास होऊ शकला नाही. कोरोनाच्या लाटांवर लाटा अशाच येत राहिल्या तर हद्दवाढ झालेल्या या नागरी वसाहतीतील नगर विकासाच्या स्वप्नांचे मनोरे मनात बांधलेली बरीचशी माणसे आपली स्वप्न अपूर्ण सोडून कोरोनाच्या महामारीत मृत्यूला कवटाळून गेल्याची खंत व्यक्त केली जात आहे. आणखी येणाऱ्या लाटांमध्ये कोण जगतो अन् कोण वाचतो? याची काळानुरूप शाश्वती नसल्याने संबंधित रहिवाशांमधून उद्विग्नता व्यक्त होत आहे.
शहर हद्दवाढ झालेल्या भागातील विद्युतीकरणाची सव्वादोन कोटी रुपयांची तर शहर हद्दवाढीसह संपूर्ण शहराची नवीन ३५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना तांत्रिक मंजुरीसाठी कोविड-१९च्या साथरोगात प्रलंबित आहे.
-रवींद्र लांडे, मुख्याधिकारी, नगरपालिका, रावेर