महिंदळे, ता.भडगाव : महिंदळे येथून पुतणीचे लग्न लावून घरी जात असताना, मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने काका पप्पू पुंजाराम सोनवणे (रा.वाघले, ता.चाळीसगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर जीवन खुशाल सोनवणे व रोहिदास गायकवाड गंभीर जखमी झाले. ही घटना नालबंदी फाट्यावर जामदा डावा कालव्याच्या वळणावर शनिवारी सायंकाळी घडली.
वाघले येथील मुलीचा महिंदळे येथे शनिवारी विवाह समारंभ होता. धूमधडाक्यात लग्न समारंभ आटोपून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास महिंदळे येथून वधूचे काका व गावातील दोन नातलग निघाले, पण काही अंतरावर नालबंदी फाट्याच्या वळणावर मोटारसायकल (क्रमांक एमएच-१९-सीएन-१२५४) वरील ताबा सुटला. यामुळे मोटारसायकल जामदा डाव्या कालव्यात पडली. कालव्यात पुलाच्या कामासाठी पाइप टाकले आहेत. पाइपाचा मार लागल्यामुळे काका पप्पू सोनवणे हे जागीच ठार झाले, तर दोन गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी पाचोरा येथे हलविण्यात आले.