भोपळा खातोय भाव; मिरची झाली अधिकच ‘तिखट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:59+5:302021-09-24T04:18:59+5:30
आनंद सुरवाडे जळगाव : आवक स्थिर असली तरी पितृपक्षात भाजीपाल्यामध्ये भाववाढ झाली आहे. यात भोपळा, दोडके, गिलके यांना अधिक ...

भोपळा खातोय भाव; मिरची झाली अधिकच ‘तिखट’
आनंद सुरवाडे
जळगाव : आवक स्थिर असली तरी पितृपक्षात भाजीपाल्यामध्ये भाववाढ झाली आहे. यात भोपळा, दोडके, गिलके यांना अधिक मागणी असून, भोपळ्याचा भाव ६० ते ८० रुपये किलोवर पोहोचला आहे. दुसरीकडे मिरची व टोमॅटोच्या दरातही गुरूवारी दुपटीने भाववाढ झाली होती. मिरची ३० रुपये किलोवर पोहोचली आहे. त्यातच घराजवळ भाजीपाला घेताना पाच ते दहा रुपये अधिकचे मोजावे लागत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
मिरचीची दहा रुपये किलोप्रमाणे विक्री होत होती. तिचे भाव वाढून ३० रुपये किलोवर पोहोचले आहेत. तर २० रुपये किलोने विक्री होणाऱ्या टोमॅटोचे भावही ४० रूपये किलोवर पोहोचले आहेत.
भाव बाजार आणि घराजवळ
गिलके ६०, ८०
भोपळा : ६०, ८०
दोडके ८०, १००
गंगाफळ : ३०, ४०
गवार ३०, ४०
वांगी : ५०, ६०
टोमॅटो ४०, ५०
बटाटे २५, ३०
मिरची ३०, ४०
फ्लॉवर : ८०, १००
मागणी वाढली...
पितृपक्षात दोडके, गिलके आणि भोपळा, गंगाफळ, फ्लॉवर यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवक स्थिर असली तरी या कालावधीत भाववाढ होत असते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. यात गिलक्यांचे भाव ६०, दोडके ८०, भोपळा ६० ते ८० रूपये किलोने विक्री होत आहे.
कोट व्यापारी
भाजीपाल्याची आवक स्थिर आहे. पितृपक्षात दोडके, गिलके, फ्लॉवर, भोपळा यांची मागणी वाढलेली आहे. पितृपक्षात भाववाढ होतच असते. टोमॅटोचे भाव गेल्या दोन दिवसात वाढले असून, २०वरून ४० रुपये किलो झाले आहेत. तर मिरची ३० रुपये किलो आहे. वाटाण्याचा सध्या सिझन नसल्याने भाव १६० ते १८० रुपये किलो आहे. - नीलेश भोळे, व्यापारी
कोट गृहिणी
बाजारात मिरची २० ते ३० रूपये किलो मिळते तर घराजवळ दहा रुपये पाव अशा भावाने मिळते. बाजारातील भाव व घराजवळ येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांकडील भाव हे थोडे अधिक असतात. मात्र, पाव किलो व अर्धा किलोच घ्यायचे असल्याने बाजारात जाणे परवडत नाही.
- वैशाली इंगळे, गृहिणी
रोजची भाजी घेण्यासाठी बाजारात जाणे परवडत नाही. एक किंवा दोन भाज्यांसाठी बाजारात कसे जाणार, त्यामुळे घराजवळ येणाऱ्या विक्रेत्यांकडूनच गृहिणी भाजी घेतात. भावात फरक असतो. बाजारापेक्षा पाच ते दहा रुपये अधिक मोजावे लागतात, मात्र वेळेवर भाजीपाला मिळतो.
- दीपाली दुसाने, गृहिणी