जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर होणार लोकसेवा आयोगाची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST2021-09-02T04:37:49+5:302021-09-02T04:37:49+5:30
जळगाव : मुंबईच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२० शनिवार, ४ सप्टेंबर रोजी सकाळी ...

जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर होणार लोकसेवा आयोगाची परीक्षा
जळगाव : मुंबईच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२० शनिवार, ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सकाळी १२ या वेळेत जळगाव शहरातील ३५ उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून ११ हजार ४६३ परीक्षार्थी बसणार आहे. या परीक्षेकामी जिल्ह्यातील एकूण १ हजार १३० इतक्या अधिकारी, कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
यावेळी परीक्षार्थींना परीक्षेसाठी विहित उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून, परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळविले आहे.
हे आहे अनिवार्य़... तर यांना आहे मनाई
परीक्षा कक्षात प्रवेश करण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवाराच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान एक मूळ ओळखपत्र, तसेच त्याची एक रंगीत छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाइल फोन, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिम कार्ड, ब्युटुथ, दूरसंचार साधने वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू, तसेच पुस्तके, बॅग्स, पॅड, पाउच, कॅल्क्युलेटर आदी साधने परीक्षा केंद्राच्या परीसरात वापरण्यास सक्त मनाई आहे.
या उमेदवारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
ताप, खोकला, थंडी इत्यादी प्रकारची लक्षणे असलेल्या अथवा ३८ डिग्री सेल्सिअस अथवा १००.४ डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त तापमान असलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था स्वतंत्र करण्यात येणार आहे, तसेच परीक्षा केंद्रावर प्रवेशाच्या आधी प्रत्येक उमेदवाराची थर्मल गनद्वारे तापमान तपासणी घेण्यात येणार आहे. त्याकरिता आयोगामार्फत पुरवठादार संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे. सर्व उमेदवारांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात परीक्षा केंद्रावर आवश्यक ती खबरदारी घेऊन त्या संदर्भातील नियम पाळणे बंधनकारक आहे.