आठ तालुक्यांत सार्वजनिक ध्वजारोहण तर ८ हजार कुटुंबे करणार भारतमाता प्रतिमापूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:38+5:302021-08-13T04:21:38+5:30
जळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण होत आहे. १५ ऑगस्टपासून स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करीत ...

आठ तालुक्यांत सार्वजनिक ध्वजारोहण तर ८ हजार कुटुंबे करणार भारतमाता प्रतिमापूजन
जळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण होत आहे. १५ ऑगस्टपासून स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यामुळे अभाविपकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रविवारी आठ तालुक्यांतील ४७ ठिकाणी सार्वजनिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे, तर ६५० गावांमधील ८ हजार २५० कुटुंबे भारतमाता प्रतिमेचे पूजन करणार असल्याची माहिती अभाविप कार्यक्रम जिल्हाप्रमुख इच्छेश काबरा व कार्यक्रम महानगरप्रमुख आकाश पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
अभाविपकडून दहा हजार भारतमाता प्रतिमांचे घरोघरी वाटपदेखील करण्यात येणार आहे.
वक्तृत्व, लघुपट स्पर्धांचे आयोजन
तालुका, शहर, वस्ती, पाडा व कॉलनीतील घरोघरी प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी परिषद नागरिकांना सहभागी करून घेणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ऑनलाइन स्पर्धांचे आयोजनही करण्यात आलेले आहे. यात वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, लघुपट स्पर्धा याचा समावेश आहे.
एक शाम देश के नाम...
१४ ऑगस्ट रोजी एक शाम देश के नाम व सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात एकूण १२ ठिकाणी परिषद की पाठशाला घेण्यात आली होती. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची वेशभूषेत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच काही ठिकाणी माजी सैनिकांचा, कोरोना योद्धांचा, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. काही चौकांमध्ये भारतमातेचे सामूहिक प्रतिमापूजन होईल. तसेच ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ गावांमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रमदेखील घेण्यात येणार आहे, अशीही माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख डॉ. सुनील कुळकर्णी, महानगर अध्यक्ष प्रा.भूषण राजपूत, जिल्हा सहसंयोजक सारंग पाटील, महानगरमंत्री आदेश पाटील, रितेश महाजन, ज्ञानेश्वर उद्देवाल, चैतन्य बोरसे आदींची उपस्थिती होती.