वरखेडे-लोंढे प्रकल्पांतर्गत पुनर्वसनासाठी २६ कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:32+5:302021-07-14T04:20:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे-लोंढे प्रकल्पाच्या अंतर्गत तामसवाडी गावठाणाच्या पुनर्वसनासाठी तब्बल २६ कोटी रूपयांच्या तरतुदीला ...

वरखेडे-लोंढे प्रकल्पांतर्गत पुनर्वसनासाठी २६ कोटींची तरतूद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे-लोंढे प्रकल्पाच्या अंतर्गत तामसवाडी गावठाणाच्या पुनर्वसनासाठी तब्बल २६ कोटी रूपयांच्या तरतुदीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून, शासनाकडे मागणी लावून धरली होती. अखेर राज्य शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.
चाळीसगाव तालुक्यात गिरणा नदीवर मध्यम स्वरूपाच्या वरखेडे-लोंढे प्रकल्पाच्या कामाला गती मिळालेली आहे. यामुळे ३५.३८ दलघमी इतक्या पाण्याचा साठा होणार आहे. यामुळे परिसरातील ३१ गावांना लाभ होणार आहे. दरम्यान, या तामसवाडी गाव प्रकल्पात जाणार नसल्याचे पाटबंधारे खात्याने सांगितले होते. मात्र प्रकल्प पूर्णत्वाकडे येत असतांना तामसवाडीच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी तामसवाडी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. याबाबत आधी अंशत: मान्यता मिळाली असून गुलाबराव पाटील यांनी याला १०० टक्के मान्यता मिळवून देण्याची मागणी तेथील ग्रामस्थांनी केली होती. मुंबईत महाराष्ट्र राज्य पुनर्वसन आणि पुनर्स्थापना सनियंत्रण समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात निमंत्रित सदस्य या नात्याने जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीत वरखेडे-लोंढे प्रकल्पात तामसवाडी या गावाचे १०० टक्के पुनर्वसन होणार आहे. यासाठी २५ कोटी ८९ लाख रूपयांची तरतूद करावी अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली.