जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागात बनावट कागदपत्रांच्या आधारे ९ कामे प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 23:00 IST2018-06-26T22:58:57+5:302018-06-26T23:00:27+5:30
अधिकारी,कर्मचारी, मक्तेदाराचा संगनमताने भ्रष्टाचार

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागात बनावट कागदपत्रांच्या आधारे ९ कामे प्रदान
जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागातील पुलाच्या बांधकामाच्या ५५ लाखांच्या कामाच्या ई-निविदेत अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने खोट्या दस्तऐवजांचा वापर करून भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तक्रारीची गांभीर्यपूर्वक पडताळणी न करता ७३ पैकी ९ कामे बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रदान केल्याचा ठपका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता तथा चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे.
ाक्तेदाराने हरिद्वार येथील कंपनीकडून मशिनरी खरेदी केल्याबाबतची खोटीच बिले जोडली असून ती खरी असल्याची पडताळणी सुरू झाल्यावर कार्यकारी अभियंता उत्तर विभाग यांच्याच कार्यालयातून सदर कंपनीच्या नावाचा बनावट ई-मेल आय-डी तयार करून तेथून कार्यकारी अभियंता उत्तर विभाग यांना बिले खरी असल्याचा बनावट ई-मेल पाठविल्याचे सायबर सेलने केलेल्या तपासात स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीने सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिकचे मुख्य अभियंता यांना पत्र पाठवून चौकशी करण्यास सांगितले होते. मुख्य अभियंता यांनी दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, नाशिकचे अधीक्षक अभियंता एस.एस. पाटील यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार पाटील यांनी चौकशी करून अहवाल दिला. तो समितीला सादर झाला आहे.
-----
अहवालातील अन्य ठपके
विनय बढे यांनी सेहगल इंडस्ट्रीजची खोटी बिले सादर केली आहेत.
अनुप्रेम कन्स्ट्रक्शन, जळगाव यांनी कार्यकारी अभियंता, लघुसिंचन (जलसंधारण) विभाग यांचे अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर केले आहे.
कार्यकारी अभियंता यांनी ८ मार्च २०१८ रोजी कागदपत्रासोबत सादर केलेले पत्र बनावट ई-मेलवरून आलेले व बनावट आहे.