पक्ष, संघटनांची केंद्र सरकार विरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST2021-03-27T04:16:54+5:302021-03-27T04:16:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून संयुक्त किसान ...

पक्ष, संघटनांची केंद्र सरकार विरोधात निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चाने आज भारत बंद पुकारला होता. या भारत बंदमध्ये जळगाव शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आंदोलन केले. तसेच विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र त्याव्यतिरिक्त शहरातील सर्व व्यवहार सुरळीत होते.
जळगाव शहरात संयुक्त किसान मोर्चाने मणियार बिरादरी आणि लोकसंघर्ष मोर्चाने या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. त्यात उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, डॉ.रियाज खाटीक, सलीम इनामदार आदी उपस्थित होते.
या भारत बंदला मनपाच्या गाळेधारकांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, वाल्मिक पाटील, युवक अध्यक्ष रविंद्र पाटील, सलीम इनामदार यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात घोषणा देण्यात आली. वाढती महागाई, कृषी कायदे, कामगार विरोधी धोरण याचा आंदोलनकर्त्यांनी निषेध केला.
काँग्रेसचे उपोषण
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत काँग्रेस भवनातच उपोषण केले. त्यासोबतच सर्व तालुक्यांच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनांना पाठिंबा देण्यासाठी हे उपोषण करण्यात आले. त्यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, डॉ. अर्जुन भंगाळे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, श्याम तायडे, प्रदीप सोनवणे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी मंगला पाटील, वाल्मिक पाटील, शशी तायडे, योगिता शुक्ला, छाया कोरडे आणि इतर उपस्थित होते.
ऑल इंडिया ट्रेड युनियन
तिन कृषी कायद्याविरोधात भारत बंद पुकारण्यात आला. त्यावेळी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात सरकारने हे कायदे मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यात कॉ. अमृतराव महाजन, राजेंद्र झा, जे.एन. बाविस्कर यांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहे.
बाजार समित्यांमध्ये व्यवहार सुरळीत
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याचे तसेच धान्य मार्केटमध्ये व्यवहार दिवसभर सुरळीत होते. त्यासोबतच शहरातील बाजारपेठेत देखील नियमीत खरेदीविक्री सुरू होती. त्यावर बंदचा कोणताही परिणाम झालेला नव्हता. गाळेधारकांनीही आजच बंद पुकारलेला असल्याने बाजारपेठेच्या काही भागात शुकशुकाट होता.
कोट - भाजपने मिळालेल्या बहुमताचा दुरूपयोग करून भांडवलशाहीसाठी फायद्याचे कायदे केले आहेत. त्यात कृषी विधेयकांचा समावेश आहे. त्या बिलाच्या निषेधार्ह १२० दिवसांपासून शेतकरी उपोषण करताहेत. इंधन दराला आळा घालण्यासाठी आज काँग्रेसने निर्दशने करत आहोत. - डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार, काँग्रेस