आमदारांच्या गैरवर्तनाचा काळ्या फिती लावून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:15 IST2021-03-28T04:15:35+5:302021-03-28T04:15:35+5:30

कामगार संघटना : कठोर कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या ...

Protest against the misconduct of MLAs with black ribbons | आमदारांच्या गैरवर्तनाचा काळ्या फिती लावून निषेध

आमदारांच्या गैरवर्तनाचा काळ्या फिती लावून निषेध

कामगार संघटना : कठोर कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महावितरणचे अधिक्षक अभियंता फारुख शेख यांना खुर्चीला बांधून गैरवर्तन केल्याच्या निषेधार्थ शनिवारी कामगार संघटनांच्या झालेल्या द्वारसभेत कामगारांनी या घटनेचा काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई होण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याबाबतचा निर्णयही या द्वारसभेत घेण्यात आला.

महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयात झालेल्या या द्वारसभेला सबाॅर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी, महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार संघटनेचे आर. आर. सावकारे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे वीरेंद्रसिंग पाटील, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सुरेश पाचंगे, महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर संघटनेचे सादिक शेख यांच्यासह विविध विभागांचे अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी परिमंडळतील सर्व महावितरणच्या कार्यालयांमध्ये तेथील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने करित निषेध नोंदविला. दरम्यान, पोलीस प्रशासनाने आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांना शनिवारी रात्री उशिरा अटक केल्यानंतर, कामगार संघटनांनी आपले कामबंद आंदोलन मागे घेतले आहे.

मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार

सध्या पोलिसांनी आमदार चव्हाण यांना अटक केली असली तरी, राजकीय दबावातून त्यांच्यावरील कारवाई टळू शकते, किंवा शिक्षा कमी होवू शकते. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता दाखल गुन्ह्यातील कलमांप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महावितरणच्या विविध संघटनांचे पदाधिकारी मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेणार असल्याची माहिती सबाॅर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन पदाधिकारी मोहन भोई यांनी सांगितले.

Web Title: Protest against the misconduct of MLAs with black ribbons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.