फिर्यादीच फितूर, ‘डीएनए’ने अकवले
By Admin | Updated: December 1, 2015 00:47 IST2015-12-01T00:47:23+5:302015-12-01T00:47:23+5:30
सामूहिक बलात्कार प्रकरणात मूळ फिर्यादीसह 12 साक्षीदार फितूर झाल्याने या खटल्यात सरकार पक्षासमोर कडवे आव्हान होते.

फिर्यादीच फितूर, ‘डीएनए’ने अकवले
धुळे : तालुक्यातील तिखी शिवारातील डेडरगाव तलाव परिसरात 24 सप्टेंबर 2013 रोजी दुपारी 12.30 ते 3.30 वाजेदरम्यान घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात मूळ फिर्यादीसह 12 साक्षीदार फितूर झाल्याने या खटल्यात सरकार पक्षासमोर कडवे आव्हान होते. मात्र, पीडित मुलीच्या जनुकीय (डीएनए) चाचणीच्या अहवालासह आरोपींकडे असलेल्या भ्रमणध्वनीच्या मेमरी कार्डवरून तयार केलेली सीडी या दोन्ही गोष्टी खटल्यात महत्त्वपूर्ण पुरावे ठरल्या. खटल्याची थोडक्यात हकिकत अशी, मोहाडीच्या रामनगरातील 16 वर्षीय मुलीची गावातीलच एका अल्पवयीन मुलाशी मैत्री होती. 24 सप्टेंबर 2013 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास तो मुलगा पीडित मुलीला तिखी गावात नातेवाइकांकडे कार्यक्रम असल्याचे सांगून दुचाकीवरून सोबत घेऊन गेला. मात्र तिखी येथे न जाता त्याने मुलीस डेडरगाव तलावाच्या बॅकवॉटर पुलाजवळ निर्मनुष्य ठिकाणी आणले. थोडय़ा वेळाने तेथे त्या मुलाचे मित्र राहुल भास्कर गावडे, महेश शिवदास गावडे व राजू दगडू गावडे हे तिघे आले. त्यांनी मुलीला पुलाखाली नेऊन जबरदस्तीने त्या मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. तेव्हा राजू गावडे भ्रमणध्वनीत या प्रकाराचे चित्रीकरण करत होता. याच वेळी तेथून एका ट्रॅक्टरवरून संतोष रोहिदास बोरसे, एकनाथ रामदास पवार, चंदर दशरथ उर्फ एकनाथ मोरे व धर्मा भगवान अहिरे हे जात होते. त्यांनी हा प्रकार पाहून ट्रॅक्टर थांबवले. त्यांनीही मुलीवर जबरदस्ती करत आळीपाळीने बलात्कार केला. घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या एका झोपडीतील दोन जण मुलीला वाचविण्यासाठी तेथे आले. तेव्हा बलात्कार करणारे सर्व जण पळून गेले. काही वेळानंतर मुलीवर बलात्कार करणा:या तिच्या मित्रानेच तिला दुचाकीवरून पुन्हा घरी सोडले. या प्रकाराची कोणाकडे वाच्यता केली तर भ्रमणध्वनीत केलेले बलात्काराचे चित्रीकरण सर्वाना दाखवून जीवे ठार मारू, अशी धमकी त्याने मुलीला दिली होती. बदनामीच्या भीतीपोटी पीडित मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, काही दिवसांनी तिच्या अल्पवयीन मित्राने पुन्हा भ्रमणध्वनीवरून फोन करून भेटण्यास सांगितले. भेटली नाही तर चित्रीकरण दाखवू, अशी धमकी त्याने दिली. म्हणून घाबरलेल्या पीडित मुलीने सारा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांसोबत येऊन पीडित मुलीने मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली होती. निकालानंतर आक्रोश निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात नागरिकांची गर्दी होती. निकाल जाहीर होताच आरोपींच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. आरोपींनाही रडू कोसळले. न्यायालयाच्या आवारात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.