पाऊस लांबल्याचा कपाशीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST2021-08-24T04:21:40+5:302021-08-24T04:21:40+5:30

पावसाच्या अनियमितपणामुळे चोपडा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सुमारे ६० टक्के भागात बागायतदार शेतकऱ्यांनी संकरित आणि सुधारित कापसाची लागवड ...

Prolonged rains hit cotton | पाऊस लांबल्याचा कपाशीला फटका

पाऊस लांबल्याचा कपाशीला फटका

पावसाच्या अनियमितपणामुळे चोपडा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सुमारे ६० टक्के भागात बागायतदार शेतकऱ्यांनी संकरित आणि सुधारित कापसाची लागवड केली आहे, तर दिनांक २३ रोजी कडक ऊन असल्याने व दोनच दिवस पाऊस पडल्याने शेती हंगाम अडचणीत सापडला आहे. पाऊस पडण्यापूर्वी कडक ऊन पडले होते. त्यामुळे बहुतांश बागायतदार शेतकऱ्यांनी कापसाला पाणी भरणे सुरू केले होते. जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी पाणी भरल्यानंतर पाऊस आल्याने कापसाच्या झाडावरील सर्व बाहेर म्हणजे फुल पाती गळून पडला आहे. त्यामुळे हातात येणारे उत्पन्न येईलच असे सध्या शाश्वती वाटत नसल्याने शेतकरी धास्तावला आहे.

सर्वत्र पीक परिस्थिती धोक्यात आणि गंभीर असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने आणेवारी २० पैशांच्या खालीच जाहीर करावी आणि चोपडा तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सर्वत्र शेतकरी करीत आहेत. तसेच अनेक केळी उत्पादक व ऊस उत्पादक शेतकरी पीक विम्यापासून वंचित असतात आणि ज्या शेतकऱ्यांचा शेतात खरोखर केळी किंवा ऊस उभा नसतो अशा शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. याबाबतीतही वंचित असलेले शेतकरी संतप्त झालेले आहेत. म्हणून पीक विमाबाबत सखोल चौकशी व्हावी, अशीही मागणी सर्वत्र होत आहे.

## ई-पीक पाहणी अडकली लोकेशनमध्ये :-

तालुक्यात शासनातर्फे ई पीक पाहणी व नोंदणी प्रकल्प सुरू करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई नोंद करून घ्यावी, असे आवाहन महसूल विभागामार्फत तहसीलदार अनिल गावित यांच्यामार्फत करण्यात आले आहे. महसूल विभागाचा ई पीक पाहणीचा प्रकल्प १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२१ पावेतो राज्यभर राबविण्यात येत आहे. याबाबत शासनाने आदेश जारी केला असून, याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

परंतु, तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनही ई पीक पाहणी करता येत नाही. असे दिसून येते. ई पीक पाहणी करताना संपूर्ण माहिती भरली जाते; पण शेवटी पिकाचा फोटो घेताना लोकेशन कसे घ्यायचे हेच समजत नाही. लोकेशन सुरू केल्यानंतरही फोटो अपलोड होत नाही. या द्विधामनःस्थितीत शेतकरी सापडला आहे. या ॲपमध्ये बदल करून फोटो काढून तो अपलोड करता यावा, तसेच याच्यामध्ये सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

---

वार्तापत्र

Web Title: Prolonged rains hit cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.