डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी देण्यास मनाई, यंत्रणा मात्र कोरोना नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST2021-08-19T04:22:07+5:302021-08-19T04:22:07+5:30
जळगाव : डॉक्टरांनी औषधीसाठी चिठ्ठी लिहून दिल्याशिवाय औषध विक्रेत्यांनी औषधी देऊ नये, अशा सूचना असल्या तरी शहरात विनाचिठ्ठी औषधींची ...

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी देण्यास मनाई, यंत्रणा मात्र कोरोना नियंत्रणात
जळगाव : डॉक्टरांनी औषधीसाठी चिठ्ठी लिहून दिल्याशिवाय औषध विक्रेत्यांनी औषधी देऊ नये, अशा सूचना असल्या तरी शहरात विनाचिठ्ठी औषधींची सर्रास विक्री केली जात असल्याची स्थिती आहे. अशा मेडिकलची तपासणी करून त्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, विनाचिठ्ठी औषधी न देण्याच्या सूचना असल्या तरी कोरोनाच्या काळात यंत्रणा ऑक्सिजन, रेमडेसिविर पुरवठ्यात अडकल्याने या दरम्यान मेडिकलच्या तपासणीत अडचणी आल्या.
कोणतीही औषधी घेताना ती डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली पाहिजे, असे सांगितले जाते व तशा सूचनादेखील असल्याने या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणीदेखील केली जाते. त्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर तर कोरोनाचे लक्षणे असलेल्या सर्दी, खोकला व इतर आजाराच्या औषधी घेऊन अनेक जण घरीच उपचार करीत होते. त्यामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मेडिकल चालकांनी औषधी देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या. मात्र कोरोनाच्या या काळात ऑक्सिजन व रेमडेसिविरवरील नियंत्रण, पुरवठा या विषयीची जबाबदारी या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असल्याने ते यातच व्यस्त राहिले. त्यामुळे मेडीकलची तपासणी होण्यास अडचणी येऊ लागल्या. अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे औषध दुकानांच्या तपासणीत अडथळे आले.
अशी झाली कारवाई
मेडिकलवर तपासणी केली असता डॉक्टरांच्या चिठ्ठीविना औषधी दिली जात असल्याचे आढळून आल्याने संबंधित मेडिकल चालकांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या.
कोरोना काळात सर्दी, अंगदुखीसाठी डॉक्टरकडे कोण जाणार?
- सुरुवातीपासूनच सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी असा त्रास होऊ लागल्यानंतर बहुतांश जण थेट मेडिकलवर जाऊन याच्या उपचारासाठी औषधे घेतात.
- त्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेतदेखील अनेक जणांनी थेट मेडिकलवरूनच औषधी घेतली. मात्र यामुळे अनेकांचा आजार नंतर वाढल्याने प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या.
- कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक जण डॉक्टरांकडे जायला घाबरुदेखील लागले. रुग्णालयात जाऊन विनाकारण संपर्कात येण्यापेक्षा मेडिकलवरून औषधी घेतलेलीच बरी, या विचाराने डॉक्टरांकडे जाणे अनेकांनी टाळले.
अनेक ठिकाणी मिळतात चिठ्ठीशिवाय औषधी
भास्कर मार्केट
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी देऊ नये, अशा सूचना असल्या तरी असा प्रकार सुरूच असल्याचे भास्कर मार्केटमधील एका मेडिकलवर आढळून आले. या ठिकाणी डोकेदुखी बरी होण्यासाठी गोळी मागितली असता ती विनाचिठ्ठी मिळाली.
रामानंदनगर परिसर
रामानंद नगर परिसरातदेखील एका मेडिकलवर सर्दी बरी होण्यासाठी औषधी मागितली असता तेथे सहज औषधी देण्यात आली. चिठ्ठीविषयी कोणतीही विचारणा झाली. शिवाय बिलदेखील देण्यात आले नाही.
अन्न व औषध प्रशासन म्हणते
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी देण्यास मनाई आहे. कोरोना काळात तर अधिक सक्ती करण्यात आली. जे विनाचिठ्ठी औषधी देतात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. कोरोना काळात इतर कामांमध्ये यंत्रणा अडकल्याने काहीशा अडचणी आल्या.
- अनिल माणिकराव, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग