कारागृहात महिला बंदीचा साडी फाडून गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST2021-09-14T04:21:20+5:302021-09-14T04:21:20+5:30

जळगाव शहरात मामाकडे आलेल्या अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यासोबत बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न व अत्याचार केल्याप्रकरणी शनिपेठ अनिताचा मुलगा भारत ...

Prisoner's sari torn and strangled in jail | कारागृहात महिला बंदीचा साडी फाडून गळफास

कारागृहात महिला बंदीचा साडी फाडून गळफास

जळगाव शहरात मामाकडे आलेल्या अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यासोबत बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न व अत्याचार केल्याप्रकरणी शनिपेठ अनिताचा मुलगा भारत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यात त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात भारतला सहाय्य केले म्हणून अनिता चावरे हिलाही आरोपी करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात तिला अटक झाली होती, तेव्हापासून ती न्यायालयीन कोठडीत आहे. जळगावात कुणीही नातेवाईक नाहीत, त्याशिवाय जामिनासाठी कुणीही प्रयत्न करीत नसल्याच्या नैराश्यात तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर सोमवारी नियमित पाहणीसाठी येत असल्याने तुरुंग रक्षक उषा भोंबे यांनी सर्व महिला बंद्यांना बरॅकच्या बाहेर काढून रांगेत बसविले. याचवेळी संशयित अनिता चावरे ही बाथरुमचे कारण सांगून निघून गेली. त्यानंतर ती बरॅक क्रमांक २ मध्ये आली. तेथे तिने साडीचा पदर फाडला तसेच इतर महिला बंद्यांच्या अंथरुणाच्या घड्या करून त्यावर उभी राहून बरॅकमधील पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. कारागृह कर्मचारी तसेच सफाईसाठी तेथे आले असता हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने भोंबे व इतरांच्या मदतीने चावरे यांच्या गळ्यातील फास काढला. दरम्यान, कारागृह अधीक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी चावरे यांची समजूत घातली. दरम्यान, तुरुंग रक्षक उषा भोंबे यांच्या फिर्यादीवरून चावरे हिच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार पुरुषोत्तम वागळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

कोट...

संबंधित महिलेने नैराश्यातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे. मुळात कारागृहात क्षमतेपेक्षा दुप्पट बंदी आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाची मोठी कसरत होत आहे.

- अनिल वांढेकर, अधीक्षक, कारागृह

Web Title: Prisoner's sari torn and strangled in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.