धान्याची आवक कमी होऊनही भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:08 AM2021-05-04T04:08:11+5:302021-05-04T04:08:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू राहत असल्याने त्यानंतर मालाची आवकही ...

Prices fall despite declining grain arrivals | धान्याची आवक कमी होऊनही भावात घसरण

धान्याची आवक कमी होऊनही भावात घसरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू राहत असल्याने त्यानंतर मालाची आवकही होत नाही. यात ऐन खरेदीच्या हंगामातच गहू व इतर धान्याची आवक कमी झाली असून, त्यांचे भावदेखील कमी होत आहेत. यात गहू एक हजार ८०० ते दोन हजार ३०० रुपये प्रती क्विंटलने विक्री होत आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने घरातील माल लवकर विक्री करून शेती कामे करण्याच्या तयारीत शेतकरी असल्याने भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.

वर्षभराचे धान्य खरेदीचा हा हंगाम असतो. त्यात मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांतून गव्हाची अधिक आवक होते व तेथेच राज्य सरकारने गव्हाची खरेदी वाढविल्याने त्याची आवक कमी होऊन भाववाढ झाली होती. त्यानंतर आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते ११ या वेळेतच उघडी ठेवता येत आहे. ११ वाजल्यानंतर दुकान बंद झाल्यानंतर मालाची आवकही थांबत आहे. त्यामुळे आवक कमी होऊन भाव वाढ होणार असे वाटत असताना उलट भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हाती पैसा मिळविणे महत्त्वाचे

वेळेच्या निर्बंधामुळे धान्याची दिवसभर व पूर्ण विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक वेळा बाजार समितीमधून माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे सकाळी लवकर येऊन ११ वाजेपर्यंत जे भाव मिळतील त्या भावात माल विकून हाती पैसा पडणे महत्त्वाचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मे महिन्यापासून शेतीमध्ये खरीप हंगामाची कामे केली जातात. आता शेतकरी त्यात अडकणार असल्याने घरात असलेला माल विकण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे गहू, लाल हरभरा, दादर, जाड हरभरा यांचे भाव कमी झाले आहेत.

मोठी घसरण

खरीप हंगामामुळे शेतकरी माल विक्रीचा अधिक प्रयत्न करीत आहे. बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील चोपडा तसेच शिरपूर, मध्य प्रदेश, राजस्थान या भागातून गहू व इतर धान्य येते. यात कमी वेळ असल्याने जिल्ह्यातील व परिसरातील शेतकरी मिळेल त्या भावात माल विकत आहे. त्यामुळे त्यांचे भाव कमी-कमी होत आहे. दोन आठवड्यांपूर्वी २००० ते २५०० रुपये प्रती क्विंटल दरम्यान असलेल्या गव्हाचे भाव १८०० ते २३०० रुपये प्रती क्विंटल दरम्यान आले आहेत. अशाच प्रकारे ३००० ते ३४०० रुपये प्रती क्विंटल असलेली दादर आता १४०० ते २२०० रुपये प्रती क्विंटल, लाल हरभरा ५००० ते ५१०० रुपये प्रती क्विंटलवरून ४८०० ते ४९०० रुपये प्रती क्विंटल, जाड हरभरा ९२०० ते ९३०० रुपये प्रती क्विंटलवरून ८६०० ते ८७०० रुपये प्रती क्विंटलवर आला आहे.

————————————

सध्या निर्बंधामुळे दुकानांच्या वेळा कमी आहेत. त्यामुळे शेतकरी सकाळी लवकर जेवढा माल विकला जाईल, तेवढा अधिकाधिक प्रयत्न करीत आहे. त्यात खरीप हंगाम तोंडावर असल्याने धान्याची विक्री करणे आवश्यक असून, त्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. दिवसभर धान्य येत नसल्याने त्याची आवक कमी झाली असून, भावदेखील कमी होत आहे.

- अशोक राठी, धान्य व्यापारी.

Web Title: Prices fall despite declining grain arrivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.