दरवाढ भरमसाठ, कमी करताना फक्त ४० पैसे कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST2021-09-17T04:20:17+5:302021-09-17T04:20:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मे महिन्यापासून पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली. त्यानंतर हळूहळू करत पेट्रोलचे दर प्रति लिटर १०८.९८ ...

दरवाढ भरमसाठ, कमी करताना फक्त ४० पैसे कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मे महिन्यापासून पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली. त्यानंतर हळूहळू करत पेट्रोलचे दर प्रति लिटर १०८.९८ रुपयांवर गेले होते. आता काही दिवसांपासून पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात घट झाली आहे. सध्या जळगाव शहरात पेट्रोलचे दर हे १०८. रुपये ५४ पैशांवर आले आहेत. वाढ करताना तब्बल २५ ते ३० रुपयांनी वाढ केली. मात्र, कमी करताना फक्त ४४ पैशांनी दरात घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. त्यामुळे घरगुती गॅससोबतच पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे महागाईदेखील वाढली आहे. वाहतूक दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सरकारने मे महिन्यात पेट्रोलचे दर शंभर रुपयांपर्यंत पोहोचवले होते. त्यानंतर ठराविक कालावधीनंतर पेट्रोलच्या दरात नियमितपणे वाढ होत होती. त्याविरोधात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी मोठे आंदोलन केले. तरीही दरवाढ सुरूच होती. अखेर ऑगस्ट महिन्यांत पहिल्यांदा पेट्रोलचे दर २० पैशांनी कमी झाले. नंतर पुन्हा काही दिवसांनी पेट्रोलच्या दरात आणखी २४ पैशांनी घट आली आहे.
पेट्रोलचे दर
सध्याचे दर १०८.५४
२३ ऑगस्ट - १०८.९८
२४ ऑगस्ट - १०८.८३
१ सप्टेंबर - १०८.६८
५ सप्टेंबर १०८.५४
१४ मे ९९.८७
शहरातील पेट्रोल पंपांची संख्या - २०
दर महा होणारी पेट्रोलची विक्री - २० लाख लिटर
जिल्ह्यातील वाहनांची संख्या - १०,४८,३६७
वाहनधारकांची नजर दर कमी होण्याकडे?
गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोलचे वाढलेले दर पाहता आम्ही पुन्हा सायकल वापरण्याचा विचार करत आहे. सध्याच्या उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती असल्याने नेमके काय करावे, असा प्रश्न पडतो.
- कैलास पाटील.
पेट्रोलचे भाव वाढत आहेत. सरकारने कमी करताना हे दर काही पैशांमध्ये कमी केले आहेत. त्यामुळे फारसा फायदा होणार नाही. दर कमी करताना ज्या प्रमाणात वाढवले त्या प्रमाणात कमी करायला हवे.
- अक्षय सोनवणे.