१० पैशांच्या नाण्याला १५० रुपयांचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:31+5:302021-09-23T04:18:31+5:30
‘जुनं ते सोनं’ ; जुन्या नाण्यांची ऑनलाइन बाजारात चलती लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आपल्याकडील ‘जुनं ते सोनं’ या ...

१० पैशांच्या नाण्याला १५० रुपयांचा भाव
‘जुनं ते सोनं’ ; जुन्या नाण्यांची ऑनलाइन बाजारात चलती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आपल्याकडील ‘जुनं ते सोनं’ या म्हणीप्रमाणेच आज जुन्या वस्तूंना आधुनिक व डिजिटल समजल्या जाणाऱ्या काळात चांगला भाव मिळू लागला आहे. अनेक वर्षांपूर्वी चलनातून बाद झालेल्या नाण्यांना आज मूळ किमतीपेक्षा तब्बल १०० पटीने जास्त भाव मिळू लागला आहे. १० पैशांच्या नाण्याला १५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या सोशल साइट्सवर गेल्या काही वर्षांपासून भारतातील चलनातील बाद झालेली नाणी विक्री केली जात आहेत. या नाण्यांना ऑनलाइन साइट्सवर चांगला भाव मिळताना दिसून येत आहे.
या नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक तब्बल हजारो रुपये खर्च करण्यास तयार असल्याचे पहायला मिळत आहे. या काळात हल्ली अशी नाणी मिळत नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे ती आहेत त्यांच्यासाठी शुभ मानली जातात. देवीचा फोटो असलेली नाणी आपणही जवळ ठेवली तर आपली भरभराट होईल, अशी लोकांची श्रद्धा असते, अनेकजण काही नाणी ही शुभ असल्याने वर्षांनुवर्षे ती नाणी सांभाळून ठेवत असतात. त्यामुळे या नाण्यांची किंमत वाढली आहे.
जेवढी जुनी नाणी, तेवढाच मिळणार भाव
आजच्या काळात विशेषकरून गावांमधील नागरिकांच्या घरांमध्ये अनेक जुनी नाणी आढळून येतात. ही नाणी चलनात नसल्याने अनेकदा ती नाणी अडगळीच्या सामानासोबतच फेकली जात असतात. मात्र, आजच्या ऑनलाइनच्या जमान्यात या जुन्या नाण्यांचा काळ पुन्हा परतला आहे. अनेक ऑनलाइन साइट्सवर जुन्या नाण्यांना मोठी मागणी आहे. जेवढी जुनी नाणी तेवढा जास्त भाव मिळत आहे. १० ते २० पैशांच्या नाण्यांना १५० ते २०० रुपये एवढा भाव आहे, तर इंग्रजांच्या काळातील नाण्याला ५०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. हेच भाव जुन्या नोटांनादेखील मिळत आहे.
जुन्या वस्तू संग्रह करण्याची आवड असलेल्यांकडून मागणी
अनेकांना जुन्या वस्तू व नाण्यांचा संग्रह करण्याची आवड असते, अशा नागरिकांकडून ऑनलाइन साइट्सवर जुन्या नाण्यांना मागणी दिसून येत आहे. त्यामुळे अनेकजण ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या साइट्सवर अशाच जुन्या वस्तूंच्या शोधात असतात, अनेक विक्री करणाऱ्या साइट्सवर ही जुनी नाणी विक्रीसाठी ठेवून अनेकांना चांगला पैसा कमाविण्याचीही संधी उपलब्ध होत आहे.