मोबाइल पंप असल्याची बतावणी करीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST2021-07-23T04:11:43+5:302021-07-23T04:11:43+5:30

रॉकेलमिश्रित डिझेलची विक्री वाहनधारकांची फसवणूक : रावेर येथे दोघा आरोपींना अटक रावेर : नामांकित कंपनीच्या बायोडिझेलचा फिरता बायोडिझेल पंप ...

Pretending to be a mobile pump | मोबाइल पंप असल्याची बतावणी करीत

मोबाइल पंप असल्याची बतावणी करीत

रॉकेलमिश्रित डिझेलची विक्री

वाहनधारकांची फसवणूक : रावेर येथे दोघा आरोपींना अटक

रावेर : नामांकित कंपनीच्या बायोडिझेलचा फिरता बायोडिझेल पंप असल्याची बतावणी करून रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील चालकांना रॉकेलमिश्रित बायोडिझेलची विक्री करताना येथे पोलिसांनी पकडले तर त्यांच्या गोडाऊनमध्ये असा अवैध साठा करणाऱ्या दोन आरोपींना रावेर पोलिसांनी रंगेहाथ पकडून गजाआड केले आहे. त्यांच्याकडून १ लाख ९४ हजार ७६० रु. किमतीचे २ हजार ७०५ लीटर रॉकेलमिश्रित बायोडिझेल, एक रिक्षा आदी ३ लाख ६७ हजार २६० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

याबाबत रावेर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील गोपी ट्रान्सपोर्ट तथा टनकाट्याजवळ आरोपी शेख शरीफ शेख मुस्लिम (वय ३८) व शेख फिरोज शेख मुस्लिम (वय २७) दोन्ही रा. फकीरवाडा, रावेर हे नामांकित कंपनीचे बायोडिझेलची विक्री करणारा मोबाइल डिझेल पंप असल्याची बतावणी करून रस्त्यावरील वाहनचालकांची फसवणूक करून एम एच - १२/एफ डी - ८१९४ या रिक्षावर एक हजार लीटर क्षमतेच्या टाकीत ६८ हजार ४०० रुपये किमतीचे ९५० लीटर रॉकेलमिश्रित बायोडिझेल हे ॲम्सा कंपनीच्या नावाखाली अवैध विक्री करताना आढळून आले.

संबंधित आरोपींना रावेर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी पाताळगंगा रस्त्यावरील फकीरवाड्यालगत २०० लीटर क्षमतेच्या प्लॅस्टिकच्या व २ लोखंडी टाक्यांपैकी ८ टाक्या पूर्ण भरलेल्या, तर एक अर्धी व दुसरी २० लीटर रॉकेलमिश्रित डिझेलची आढळली. १ लाख २६ हजार ३६० रुपये किमतीचा १ हजार ७५५ लीटरचा अवैध साठा आढळून आला. अशा प्रकारे १ लाख ९४ हजार ७६० रुपये किमतीचे २ हजार ७०५ लीटर्स रॉकेलमिश्रित डिझेलचा साठा, एक अपे रिक्षा, बायोडिझेल विक्रीचा पंप, एक बॅटरी असा ३ लाख ६७ हजार रिपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, फौजदार मनोहर जाधव, फौजदार मनोज वाघमारे, सहायक फौजदार राजेंद्र करोडपती, पोहेकॉ भागवत धांडे, पोहेकॉ बिजू जावरे, पोना नंदू महाजन, पोना महेंद्र सुरवाडे, पोकॉ सचिन घुगे, पोकॉ प्रदीप सपकाळे, प्रमोद पाटील, सुकेश तडवी, महेश मोगरे, पुरुषोत्तम पाटील, पोकॉ सुरेश मेढे, विशाल पाटील, मंदार पाटील, कुणाल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई २१ जुलै रोजी रात्री ७.४० ते ९.४५ वाजेच्या सुमारास केली. रावेर तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक अतुल वाकोजी नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात भादंवि कलम कलम ४०६, ४२०, ३४ सह जीवनावश्यक कायदा कलम ३ व ७ प्रमाणे दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Pretending to be a mobile pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.