पिठासीन अध्यक्षांनी प्रथम शिवीगाळ केली अन् संताप वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:44+5:302021-07-07T04:21:44+5:30
जामनेर : ओबीसींच्या आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ केंद्रावर आरोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोंदींबद्दल नको ते बोलले आणि आमचा संताप ...

पिठासीन अध्यक्षांनी प्रथम शिवीगाळ केली अन् संताप वाढला
जामनेर : ओबीसींच्या आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ केंद्रावर आरोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोंदींबद्दल नको ते बोलले आणि आमचा संताप अनावर झाला. पिठासीन अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र त्यांना गांभीर्यच नसल्याने त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी शिवसेना व भाजपचे सदस्य होते. वादावादी, चिडाचिड झाली व संताप वाढला कारण पिठासीन अध्यक्षांनी प्रथम शिवीगाळ केली, असे निलंबन झालेले भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भाजपच्या १२ सदस्यांच्या निलंबनावर महाजन यांनी लोकमतला काय घडले ते सांगितले. धक्काबुक्की झालीच नाही. अध्यक्षांकडे सर्व प्रथम मीच पोहचलो, चर्चा केली, मात्र त्यांनीच सुरुवातीला शिवीगाळ केल्याने सदस्य संतापले. तरीही मी त्यांना समजावले. सदस्यांचे झालेले निलंबन राजकीय सूडबुध्दीने झाले असून, अध्यक्षपदाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रचलेले कुभांड आहे. खरे तर आघाडी सरकारला अधिवेशनच चालू द्यायचे नाही. ओबीसी, मराठा आरक्षणावर चर्चा होऊ नये, एमपीएससी परीक्षेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर जाब विचारला जाईल, या भीतीपोटी केलेला हा बनाव आहे.
आमदारांचे निलंबन म्हणजे लोकशाहीचा खून आहे. हा अन्याय कदापि सहन करणार नाही. जनतेच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणारच, असेही महाजन यांनी सांगितले.