तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी स्वतंत्र आयसीयूची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:42+5:302021-06-26T04:12:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका संभवू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले असून, त्यादृष्टीने ...

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी स्वतंत्र आयसीयूची तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका संभवू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले असून, त्यादृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवजात शिशू काळजी कक्ष विभागात असलेल्या अतिदक्षता विभाग हा पूर्णत: रिकामा करून यात आता स्वतंत्र बालकांसाठीच व्यवस्था करण्यात येणार आहे. मध्यंतरी या ठिकाणी सर्व कोविडचे रुग्ण दाखल करण्यात येत होते.
कक्ष वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले असून, बालकांसाठी साधारण ११० बेडची व्यवस्था करण्यात येत आहे, हे सर्व कक्ष स्वतंत्र बालकांसाठी राहाणार आहेत, शिवाय त्यांच्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हवे म्हणून एकत्रित परिचारिकांपैकी ५० परिचारिकांना बालरोग विभागातील आयसीयूचे अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूतीपूर्व, प्रसूती पश्चात, लहान बालकांचा कक्ष तसेच नवजात शिशू काळजी कक्ष हे सर्व कक्ष आगामी काळात केवळ लहान मुलांसाठी राहणार आहे. यातच एक स्वतंत्र आयसीयू राहणार असून, त्यासाठी दहा व्हेंटिलेटरही कार्यान्वित करण्यात आले आहेत. या व्हेंटिलेटरमुळे नुकत्याच एका बाळाला वाचविण्यात यंत्रणेला यश आले होते.
प्रशिक्षण वर्ग
परिचारिकांचे प्रशिक्षण वर्ग हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरू करण्यात आले आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेत बालकांवर विशेषत: अतिदक्षता विभागात उपचार करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारीवर्ग असणे आवश्यक असून, त्या दृष्टीने परिचारिकांनाही विशेष अतिदक्षता विभागातील उपचारांबाबत प्रशिक्षण दिले जात आहे.