प्रीत अशी जुळली... अंध वधू-वरांनी बांधली लग्नगाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:12 IST2021-07-18T04:12:44+5:302021-07-18T04:12:44+5:30
पारोळा : ब्रम्ह सुतामध्ये लग्नाची गाठ बांधली जाते, असे म्हटले जाते, याचा प्रत्यय १६ रोजी शेळावे, ता. ...

प्रीत अशी जुळली... अंध वधू-वरांनी बांधली लग्नगाठ
पारोळा : ब्रम्ह सुतामध्ये लग्नाची गाठ बांधली जाते, असे म्हटले जाते, याचा प्रत्यय १६ रोजी शेळावे, ता. पारोळा येथे आला. योगेश व वैशाली हे दोघे नवदाम्पत्य अंध आहेत. डोळे अंध आहेत; पण विचार अंध नाहीत, या विचारांनी प्रेरित होऊन दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला व हे अंध नवदाम्पत्य विवाहबद्ध झाले.
याप्रसंगी माजी आमदार स्मिता वाघ, आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. जयश्री दाभाडे, जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालिका भैरवी वाघ, दिव्यांग शक्तीचे प्रतिनिधी प्रवीण पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी संसारोपयोगी भांडे व आर्थिक मदत केली. तहसीलदार अनिल गवांदे यांनी स्वतः उपस्थित राहून वधू-वर यांना गृहोपयोगी वस्तू देऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. गटविकास अधिकारी एन.आर. पाटील यांनी आर्थिक मदत करून आशीर्वाद दिले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य रोहिदास पाटील, रजनीकांत काटे, माजी सैनिक घनश्याम काटे, सचिन काटे व अंध शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, रुग्णसेवक महेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. प्रदीप कामठे, दिनेश राठी, जानराव यांचे सहकार्य लाभले. आमदार नीलेश लंके यांनी नीलेश लंके प्रतिष्ठानमार्फत योगेश पाटील यांस जीवनावश्यक साहित्य देण्याचे आश्वासन दिले.