प्रमोद रायसोनीने दोघं नोकरांच्या नावावर घेतले १६ कोटीचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST2020-12-05T04:24:42+5:302020-12-05T04:24:42+5:30
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अर्थात बीएचआरमध्ये संस्थापक, संचालकांनी मिळून केलेले आर्थिक घोळ चक्रावून टाकणारे आहेत. ...

प्रमोद रायसोनीने दोघं नोकरांच्या नावावर घेतले १६ कोटीचे कर्ज
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अर्थात बीएचआरमध्ये संस्थापक, संचालकांनी मिळून केलेले आर्थिक घोळ चक्रावून टाकणारे आहेत. लेखापरिक्षण अहवालातून रोज नवनवीन मुद्दे समोर येत आहेत. संस्थेचा संस्थापक असलेला प्रमोद रायसोनी याने संस्थेतील दोन नोकर व इतर चार सामान्य व्यक्ती अशा सहा जणांकडून २२ कोटी ६२ लाख १५ हजार ९०९ रुपयांचे कर्ज विना व्याजी कर्ज व ठेवी घेतल्या व संस्थेच्या दोन नोकरांना प्रत्येकी ८ कोटीचे कर्ज संस्थेतून वाटप केले. एरव्ही हे सर्व जण अतिशय सामान्य व गरीब कुटुंबातील व्यक्ती आहेत. संस्थेचा सनदी लेखाधिकारी धरम साखला याने रायसोनी याचे वैयक्तीक इनकम टॅक्स ऑडीट केले आहे, त्यात हे दाखविण्यात आले आहे. सीआयडीच्या लेखापरिक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या नोकरांना प्रत्येकी आठ कोटीचे कर्ज
ईश्वर शिवराम कोळी व प्रकाश सिताराम बाविस्कर हे दोघंही रायसोनी यांचे नोकर होते. सुरेश नामदेव जिरी व ईश्वर कोळी या दोघांना नवी पेठ शाखेतून प्रत्येकी ८ कोटी रुपयांचे कॅश क्रेडीट कर्ज मंजूर होऊन ते अदा झाल्याचे दाखविण्यात आले आहे. तर प्रकाश बाविस्कर याचा खाते क्रमांक ऑडीटमध्ये आहे, मात्र कर्जाच्या रकमेचा उल्लेख केलेला नाही. सीआयडीच्या चौकशीत तसेच त्यांनी नियुक्त केलेल्या लेखापरिक्षकाच्या अहवालात हे सहा जण गरीब कुटुंबातील व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले.
धुळ्याच्या कर्जदारने भरले कर्ज
धुळे येथील बापुसाहेब अण्णा मेहत्रे यांनी संस्थेकडून २५ लाखाचे सीसी कर्ज घेतले होते. त्याची १६ जून २००८ रोजी त्यांनी पूर्ण परत फेड केले आहे. अहवालात त्यांच्या नावासमोर नील दाखविण्यात आले आहे. याव्यतिरिक्त एकाही कर्जदाराच्या नावापुढे नील दाखविण्यात आलेले नाही, याचाच अर्थ कर्जदारांनी हे कर्ज थकविले आहे. दरम्यान, प्रमोद रायसोनी, संचालक दिलीप चोरडीया,पत्नी वंदना चोरडीया यांच्यासह इतर संचालकांनी दर आर्थिक वर्षात लाख व कोटीच्या घरातच कर्ज घेतल्याचे दिसून येत असून त्यासाठी तारण अथवा इतर कोणतेही कागदपत्रे घेतलेली नाहीत. संस्थेच्या संगणकात घोळ दिसून येत असून त्यातील नोंदी चुकीच्या आढळून आलेल्या आहेत. १ एप्रिल २००४ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत केवायएसी अपूर्ण आहे तसेच कर्ज वाटपासाठी जी समिती नेमली होती, त्यांनी बैठकीच्या नोंदी घेतलेल्या नाहीत तसेच लेखापरिक्षण करताना कागदपत्रे व इतर फाईली जाणून बुजून उपलब्ध करुन देण्यात आला नसल्याचा उल्लेख सीयआयडीच्या अंतरिम लेखापरिक्षणात आहे.
संस्थेच्या खर्चातून वैयक्तिक नावावर दुचाकी
प्रमोद रायसोनी यांनी ४४ हजार ८७४ रुपये किंमतीची दुचाकी संस्थेच्या खर्चातून विकत घेतली, मात्र ही दुचाकी संस्थेच्या नावावर घेणे अपेक्षित असताना स्वत:च्या नावावर घेतली आहे, त्यावर नाशिक येथील लेखापरिक्षक परेश सी नागरीचा यांचा लेखापरिक्षणात आक्षेप घेतला आहे. दरम्यान, एका सभासदाला एकाच वेळी कर्ज देण्याची तरतूद असताना अनिल मदनलाल चोरडीया व दिलीप चोरडीया यांना वारंवार कर्ज देण्यात आलेले आहे, यावरही आक्षेप घेण्यात आलेला आहे.
तरतूद नसताना गो शाळेसाठी साडे आठ कोटीचा खर्च
संस्थेच्या नवी पेठ शाखेतून भाईचंद हिराचंद रायसोनी तळेगाव,ता.जामनेर या गोशाळेसाठी ८ कोटी ६८ लाख ५२ हजार ९९६ रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. संस्थेच्या पोटनियमात गो शाळा उघडण्यासाठी कोणतीही तरतूद नाही किंवा संचालक मंडळाचा कोणताही ठराव झालेला नाही. जी ट्रस्ट उघडण्यात आली, ती संस्थेच्या मालकीची नाही, तरी देखील त्यावर साडे आठ कोटीची उधळपट्टी दाखविण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे.
या लोकांकडून असे दाखविले घेतलेले कर्ज
१) ईश्वर शिवराम कोळी, रा. तळेगाव, ता.जामनेर
४ कोटी २७ लाख १५ हजार ४२० रुपये
२) प्रकाश सिताराम बाविस्कर, रा. तळेगाव, ता.जामनेर
४ कोटी ६२ लाख ११ हजार ५९० रुपये
३) सुभाष फुलचंद परदेशी, रा. तळेगाव, ता.जामनेर
५ कोटी ४२ लाख ४९ हजार रुपये
४) शंकर सुखदेव बोरमाडे, रा. तळेगाव, ता.जामनेर
३ कोटी ७७ लाख २३ हजार ८४४ रुपये
५) सुरेश नामदेव जिरे, रा. तळेगाव, ता.जामनेर
३ कोटी ९९ लाख रुपये
६ ) विशाल शालीक कोळी, रा. तळेगाव, ता.जामनेर
५ कोटी ४१ लाख ६ हजार ५५५ रुपये