कोविड सेंटरजवळ पीपीई किट उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 21:13 IST2020-05-26T21:13:03+5:302020-05-26T21:13:12+5:30
चाळीसगाव : संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोविड सेंटरजवळ पीपीई किट उघड्यावर
चाळीसगाव : शहरातील अंध शाळेच्या वस्तीगृहातील कोविड केअर सेंटर जवळ असलेल्या बाप्पा पॉईंट जवळ रस्त्यावर दररोज कोणीतरी अज्ञात व्यक्ती कोरोनाच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणारे पीपीई किट उघड्यावर टाकत आहे. यामुळे परिसरातील रहिवाश्यामध्ये खळबळ उडाली आहे. संबंधितावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
पीपीइ किट ( पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) म्हणजेच वैयक्तिक सुरक्षा उपकरण असून एखाद्याच्या संसगार्पासून यामुळे संरक्षण मिळते .हे साहित्य आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना दिले जाते. यात हात मोजे, पायमोजे, मास्क,गाऊन, डोक्याचे संरक्षण करण्यासाठी कव्हर, डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी गॉगल आदी सर्व वस्तू असतात. दरम्यान चाळीसगाव शहारसह ग्रामीण भागातील आतापर्यंत २०० ते ३०० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर अंधशाळेतील मुलीच्या वस्तीगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये २० जण क्वारंटाईन आहेत. या कोविड केअर सेंटरपासून जवळच असलेल्या बाप्पा पॉईट रस्त्यालगत गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोणी तरी अज्ञात व्यक्ती पीपीई किट उघड्यावरुन फेकून जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. याच परिसरात जवळपास सात ते आठ मोठे हॉस्पीटल देखील आहेत. त्यामुळे हे पीपीई किट कोण उघड्यावर फेकतात . याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे.