भुसावळ शहरासह तालुक्यात २४० ठिकाणी पोलिसांना जास्त करून द्यावी लागेल हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:35 IST2021-09-02T04:35:45+5:302021-09-02T04:35:45+5:30
भुसावळ : शहरातील गुन्हेगारी वृत्तीचा बीमोड करण्यासाठी तसेच शहरातील कानाकोपऱ्यासह मुख्य भागात हजेरीवर असलेले पोलीस दादा प्रत्यक्षात त्या पॉइंटवर ...

भुसावळ शहरासह तालुक्यात २४० ठिकाणी पोलिसांना जास्त करून द्यावी लागेल हजेरी
भुसावळ : शहरातील गुन्हेगारी वृत्तीचा बीमोड करण्यासाठी तसेच शहरातील कानाकोपऱ्यासह मुख्य भागात हजेरीवर असलेले पोलीस दादा प्रत्यक्षात त्या पॉइंटवर हजर होते की नाही, या उद्देशातून भुसावळ शहर, बाजारपेठ, तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत गस्तीवर असणाऱ्या पोलिसांसाठी २४० पॉइंटवर आरएफआयडी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीचे उद्घाटन दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते शहरातील संतोषी माता सभागृहात होत आहे.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व तालुक्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे उपस्थित राहणार आहेत.
सर्वाधिक १४० पॉइंट बाजारपेठ हद्दीत
आरएफआयडी या प्रणालीचे सर्वाधिक पॉइंट हे बाजारपेठ हद्दीमध्ये असणार आहे. तब्बल १४० पॉइंट बाजारपेठ हद्दीत लावण्यात आले आहे.
शहर हद्दीत ८०
शहर हद्दीमध्ये मुख्य चौकासह अंतर्गत गल्ल्यांमध्ये ८० पॉइंटवर आरएफआयडी बसविण्यात आली आहे.
तालुका हद्दीत २०
ग्रामीण भागातही सक्षम, सतर्क पोलीस पेट्रोलिंगसाठी संभाव्य गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टिकोनातून व ज्या पोलिसांची नेमणूक ज्या ज्या ठिकाणी करण्यात आली आहे तेथे हजर आहेत की नाही याची खातरजमा करण्यासाठी तालुका हद्दीमध्ये २० ठिकाणी आरएफआयडी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.