कौटुंबिक वादातून पोलिसाच्या पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:23 IST2021-09-10T04:23:12+5:302021-09-10T04:23:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कौटुंबिक छळाला कंटाळून कोमल चेतन ढाकणे (वय २४) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन ...

Police wife commits suicide over family dispute | कौटुंबिक वादातून पोलिसाच्या पत्नीची आत्महत्या

कौटुंबिक वादातून पोलिसाच्या पत्नीची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कौटुंबिक छळाला कंटाळून कोमल चेतन ढाकणे (वय २४) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मेहरुण परिसरातील विश्वकर्मा नगरात घडली. पती व सासू मुलांना घेऊन मेहरुण तलावाकडे फिरायला गेले होते, त्यावेळी घरात कोणी नसताना कोमल हिने आत्महत्या केली. दरम्यान, कोमलचा पती चेतन अरुण ढाकणे पोलीस दलात असून बाजार पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षापासून घरगुती कारणावर तिला वेळावेळी शिवीगाळ करत मारहाण करण्यात येत होती. कोमल हिला पहिला मुलगा झाल्यानंतर छळ अधिकच होऊ लागला. याच छळाला कंटाळून कोमल हिने आत्महत्या केल्याचा आरोप वडील प्रविण शामराव पाटील यांनी केला. गुरुवारी सायंकाळी पती चेतन व सासू मंदाबाई हे मुलांना घेऊन मेहरुण तलावाकडे फिरायला गेले होते. तेथून सहा वाजता परत आले असता कोमल ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी तिला मृत घोषित केले.

कोमलच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तिच्या आई,वडिलांसह नगरसेवक प्रशांत नाईक, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी व इतर नातेवाईकांनी रुग्णालय गाठले. पतीसह सासू यांच्याकडून होणार्या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून कोमल हिने आत्महत्या केल्याचा आरोप कोमलच्या वडिलांनी केला असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली. दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे राजू कांडेकर व अल्ताफ पठाण यांनी पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोमल हिच्या पश्चात पती चेतन, सासू मंदाबाई व दोन मुले आयुष (वय ४ वर्ष) व पियुष (पाच महिने) असा परिवार आहे.

Web Title: Police wife commits suicide over family dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.