आरटीओ निरीक्षकाला पोलिसांचे समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:06+5:302021-09-23T04:19:06+5:30
भुसावळ येथे २९ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या याप्रकरणात मोटार वाहन निरीक्षक सचिन सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, कैलास ब्रिशलाल छाबडा, ...

आरटीओ निरीक्षकाला पोलिसांचे समन्स
भुसावळ येथे २९ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या याप्रकरणात मोटार वाहन निरीक्षक सचिन सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, कैलास ब्रिशलाल छाबडा, जीडी नावाचा एजंट व एक अनोळखी व्यक्ती अशा तिघांविरुध्द १६ सप्टेंबर रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर फिर्याद देण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी निरीक्षक जी. व्ही. पाटील यांना आदेश दिले होते. मात्र हा प्रकार लिपिकाच्या लक्षात आल्याने त्यांनीच फिर्याद द्यावी असे सांगून पाटील यांनी फिर्याद देणे टाळले होते. आरटीओ कार्यालयातच छेडछाड करून फोटो चिकटविण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला होता. या कारणावरून लोही व पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला होता. आता याच प्रकरणात भुसावळ पोलिसांनी पाटील यांनी सरकारी साक्षीदार केले असून साक्ष व जबाबासाठी समन्स बजावले आहे. यातील मुख्य आरोपी छाबडा याने हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दक्षता पथक मुंबईला रवाना
आरटीओ कार्यालयात झाडाझडतीसाठी आलेले मुंबई येथील दक्षता पथक मंगळवारी सायंकाळीच मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळाली. याबाबत एका बड्या नेत्याने परिवहन आयुक्तांकडे तक्रार केली असून आर्थिक गैरव्यवहार व मुक्ताईनगर येथील तपासणी नाक्याच्या संदर्भात ही चौकशी होती. हे पथक पंधरा दिवसांनी परत येणार आहे. पुरावे आढळल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. अशाच एका प्रकरणात गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला आहे.