कंडारे, झंवरसह सहा जणांचा पोलिसांकडून शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST2020-12-04T04:42:43+5:302020-12-04T04:42:43+5:30
बीएचआर घोटाळ्यात या संशयित आरोपींचा पोलिसांकडून सुरु आहे शोध योगेश साखला योगेश किशोर साखला हा या गुन्ह्यातील अटक केलेल्या ...

कंडारे, झंवरसह सहा जणांचा पोलिसांकडून शोध
बीएचआर घोटाळ्यात या संशयित आरोपींचा पोलिसांकडून सुरु आहे शोध
योगेश साखला
योगेश किशोर साखला हा या गुन्ह्यातील अटक केलेल्या धरम साखला या आरोपीचा भाऊ आहे. योगेश याचा वकीली व्यवसाय आहे. बीएचआर व इतर संस्थांचे अंतर्गत लेखापरिक्षण करायचा. मधल्या काळात धरम साखला हा काळ्या यादीत गेल्यामुळे त्याला लेखापरिक्षणाचे काम मिळत नव्हते. त्यामुळे योगेशच्या नावावर तो कामे घेऊन अंतर्गत लेखापरिक्षण करायचा. त्याशिवाय मालमत्ता खरेदी, विक्रीचाही व्यवसाय करायचा. बीएचआरची बनावट वेबसाईट तयार करण्यासह सुनील झंवर याच्या फर्मच्या नावावर मालमत्ता वर्ग करण्याच्या कटात वाणीचा सहभाग आहे. या गुन्ह्यात योगेश यालाही आरोपी करण्यात आले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
प्रकाश वाणी
प्रकाश वाणी हा सहकार विभागातील अधिकारी आहे. त्याने स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्याचा वकीलीचाही व्यवसाय आहे. जितेंद्र कंडारे हा सहकारातील अधिकारी असल्याने वाणी याची त्याच्याशी ओळख व मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे बीएचआरमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांना घेण्यात आले होते. मालमत्ता विक्रीसाठी निविदा काढणे, जागांचे मूल्यांकन काढणे आदी कामे करायचा. त्याशिवाय कंडारेचे अंतर्गत कामेही तो बघायचा. या गुन्ह्यात त्यालाही आरोपी करण्यात आलेले
कुणाल शहा
कुणाल शहा हा संगणक व सायबर तज्ज्ञ आहे. तो अहमदाबादला (गुजरात) वास्तव्याला आहे. महावीर जैन याच्या माध्यमातून त्याने बीएचआरमध्ये नवीन सॉफ्टवेअर तयार करुन दिले. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यात पाहिजे त्यावेळी मागील तारखेचे अथवा हवा तसा बदल करता येतो. एकूणच या अपहाराच्या कटात त्याचाही सहभाग आहे. महिना व कधी आठवड्यातून एकदा तो बीएचआरच्या कार्यालयात यायचा. पोलिसांनी त्याला देखील आरोपी केले असून एक पथक त्याच्या शोधासाठी अहमदाबाला गेलेले आहे.
आकाश माहेश्वरी
आकाश माहेश्वरी हा अमळनेरमध्ये पोलीस लाईनच्या बाजुला शाळेजवळ वास्तव्याला आहे. बीएचआरच्या अमळनेर शाखेचा सल्लागार होता. त्याच्याच जागेत शाखा सुरु करण्यात आली होती. याआधी तो धुळ्यात शेअर मार्केटींगचे काम करायचा. तेथे काही वाद निर्माण झाल्यानंतर त्याने अमळनेर गाठले. शालेय पोषण आहाराचे धान्य वितरीत करण्याचेही तो काम करायचा. मालेगावमध्ये त्याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. संस्था बुडाली असे सांगून २५ ते ३० टक्क्यांनी ठेवीदारांच्या पावत्या घेऊन १०० टक्के रक्कम मिळाल्याचे खोटे शपथपत्र तयार करुन ठेवीदारांची फसवणूक करीत होता.