अपघात रोखण्यासाठी पोलीस, महसूल व ‘नही’चे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:13 IST2021-06-20T04:13:53+5:302021-06-20T04:13:53+5:30
गेल्या पंधरा दिवसात पाळधी ते नशिराबाद या दरम्यान महामार्गावर अपघाताची संख्या वाढली. गुजराल पेट्रोल पंपाजवळ बापलेक ठार झाले तर ...

अपघात रोखण्यासाठी पोलीस, महसूल व ‘नही’चे नियोजन
गेल्या पंधरा दिवसात पाळधी ते नशिराबाद या दरम्यान महामार्गावर अपघाताची संख्या वाढली. गुजराल पेट्रोल पंपाजवळ बापलेक ठार झाले तर दूरदर्शन टॉवरजवळ दीड महिन्यांपूर्वी लग्न झालेला तरुण ठार झाला. यापूर्वीदेखील अपघात होऊन त्याने तरुण व्यक्ती ठार झाल्या. जळगाव शहर व परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर शिव कॉलनी व तरसोद फाटा हे दोन ब्लॅक स्पॉट प्रशासनाने यापूर्वीच निश्चित केलेले आहेत. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी डॉ. मुंढे व सिन्हा यांनी भेट दिली. दरम्यान, जेथे गरज आहे तेथे दुभाजक तयार करणे, गतिरोधक, वळण रस्ता, धोकादायक ठिकाण यांसह वाहतूक नियमांचे फलक लावण्याचे नियोजन करण्यात आले. तातडीने जेथे आवश्यक आहे, तेथे पोलीस दलाच्या निधीतून हा खर्च केला जाईल, उर्वरित ठिकाणी ‘नही’ने खर्च करावा व जास्त तसेच अधिकार क्षेत्राच्या बाहेर खर्च करावा लागत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेऊन हे विषय मार्गी लावले जातील, असे डॉ. मुंढे यांनी सांगितले.
संपूर्ण जिल्ह्यातील रस्त्यांची पाहणी करण्याचे आदेश
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी जिल्ह्यातील आठही पोलीस उपअधीक्षकांना त्यांच्या उपविभागातील रस्त्यांची पाहणी करून अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्याचे नियोजन करून किमान १५ ठिकाणी किरकोळ उपाययोजना करण्याबाबत शनिवारी सूचना दिल्या. या पाहणीच्यावेळी नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश चव्हाण, तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.