मास्टर माईंड कळमकरच्या तीन घरांवर पोलिसांचे छापासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:20 IST2021-09-09T04:20:47+5:302021-09-09T04:20:47+5:30
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ सप्टेंबर रोजी पहाटे अडीच वाजता कळमकर याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. सध्या ...

मास्टर माईंड कळमकरच्या तीन घरांवर पोलिसांचे छापासत्र
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ सप्टेंबर रोजी पहाटे अडीच वाजता कळमकर याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. सध्या तो १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे. पोलीस उपअधीक्षक भास्कर डेरे, तपास अधिकारी संदीप पाटील, सहायक फौजदार शकील पठाण, नीलेश सूर्यवंशी, वसीम शेख, नितीन सपकाळे, दीपक गुंजाळ, किशोर काळे, अजय चौधरी, आदींची दोन पथके बुधवारी पहाटेच अहमदनगरकडे रवाना झाली. सर्वांत आधी या पथकाने धर्मादाय आयुक्त कार्यालयात पत्रव्यवहार केला. कळमकर याच्या नावे असलेल्या संस्था, त्यांचे कार्य, उद्दिष्ट तसेच त्यांची मुदत व सद्य:स्थिती याबाबत माहिती मागविली आहे. त्यानंतर दोन राष्ट्रीयीकृत व एक नागरी सहकारी अशा तीन बँकांमध्ये पत्र देऊन व्यवहाराची माहिती मागविली आहे. त्यानंतर पथकाने विभागणी करून त्याच्या घरांवर छापासत्र राबविले. दैठणे गुंजाळ हे त्याचे मूळ गाव असून, पारनेर येथे तो भाड्याच्या घरात राहतो तसेच सुपा येथे त्याची एका ठिकाणी गुप्त बैठक चालते, येथेदेखील पोलिसांनी झडती घेतली. कळमकर यालादेखील पोलिसांनी सोबत घेतले आहे. दरम्यान, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेनेही जळगावच्या पथकाला सहकार्य केले. एमसीव्हीआरटी ही संस्था महाराष्ट्र संस्था अधिनियम १९६० व मुंबई संस्था नोंदणी अधिनियम १९५० या कायद्यान्वये नोंदणी असल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात ही संस्था कोणत्याही कायद्याने नोंदणी नसल्याचे तपासात उघड झाले आहे.