समृद्धी केमिकल्सच्या मालकांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST2021-05-18T04:17:23+5:302021-05-18T04:17:23+5:30

जळगाव : समृध्दी केमिकल्समधील दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या सुबोध सुधाकर चौधरी, सुनील सुधाकर चौधरी व सुयोग सुधाकर चौधरी या ...

Police custody to owners of Samrudhi Chemicals | समृद्धी केमिकल्सच्या मालकांना पोलीस कोठडी

समृद्धी केमिकल्सच्या मालकांना पोलीस कोठडी

जळगाव : समृध्दी केमिकल्समधील दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या सुबोध सुधाकर चौधरी, सुनील सुधाकर चौधरी व सुयोग सुधाकर चौधरी या तिघांना न्यायालयाने सोमवारी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, तीन जणांच्या मृत्यूची घटना घडल्यापासून समृध्दी केमिकल्स कंपनीचे उत्पादन थांबविण्यात आले आहे.

जुन्या औद्योगिक वसाहतीतील अयोध्यानगर येथील समृध्दी केमिकल्स या कंपनीत सांडपाणी व वेस्टेज केमिकल्स साठविण्याची टाकी स्वच्छ करीत असताना त्यात बुडून रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (३२, रा. चिंचोली, ता. यावल), मयुर विजय सोनार (३५, रा. कांचननगर) व दिलीप अर्जुन सोनार (५४, रा. कांचननगर, मूळ रा. पाल, ता. रावेर) या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना १५ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत घटनेचे प्रत्यक्षदर्शी इतर कामगारांचे जबाब नोंदविले आहेत. संबंधित केमिकलचे सांडपाणी असलेल्या चेंबरमध्ये विषारी वायू तयार होतो. हे माहीत असतानाही कंपनीच्या मालकांनी सुरक्षेची कोणतीही उपाययोजना केली नाही, कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही कपडे अथवा साहित्य न देता टाकीत उतरविले व त्यात त्यांचा मृत्यू झाला, असे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरून सुबोध सुधाकर चौधरी, हिरा सुबोध चौधरी, अपर्णा सुयोग चौधरी, सुनील सुधाकर चौधरी, सुयोग सुधाकर चौधरी (सर्व, रा. सागरनगर, एमआयडीसी) या पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात सुबोध चौधरी, सुनील चौधरी व सुयोग चौधरी या तिघांना रविवारी अटक करण्यात आली आहे. तपास अधिकारी प्रताप शिकारे यांनी तिघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्या. अक्षी जैन यांनी तिघांना १८ मेपर्यंत एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Police custody to owners of Samrudhi Chemicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.