पोलीस पाटलास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST2021-07-04T04:12:33+5:302021-07-04T04:12:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यावल : वाळूचे ट्रॅक्टर तहसीलदारांना पकडायला लावल्याच्या संशयावरून पोलीस पाटलास मारहाण केल्याची घटना २ ...

पोलीस पाटलास मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
यावल : वाळूचे ट्रॅक्टर तहसीलदारांना पकडायला लावल्याच्या संशयावरून पोलीस पाटलास मारहाण केल्याची घटना २ जुलै रोजी रात्री आठला सावखेडासीम, ता. यावल येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटांतील परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास तालुक्यातील सावखेडासीम येथील पोलीस पाटील पंकज जीवराम बडगुजर हे आपल्या कुटुंबासोबत जेवण करीत होते. तेव्हा गावातील प्रकाश सुभाष पाटील, दिलीप सुभाष पाटील, विकास पंडित पाटील, विजय विकास पाटील, चेतन विकास पाटील यांनी त्यांच्या घरात अनधिकृत प्रवेश केला. ‘तू आमचे रेतीचे ट्रॅक्टर तहसीलदारांना पकडायला लावतो’, असे बोलून तू पोलीस पाटील कसा राहतो, अशी धमकी देत शिवीगाळ केली. तसेच पोलीस पाटील यांना खाटेच्या दांड्याने मारहाण केली. याशिवाय भावाची पत्नी पूनम बडगुजर व भाऊ जीवन दयाराम बडगुजर, राहुल जीवन बडगुजर यांनाही लाकडी दांड्याने मारहाण करून दुखापत केली. याबाबत पोलीस पाटील पंकज बडगुजर यांनी यावल पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
परस्परविरोधी फिर्याद
यासंदर्भात दुसऱ्या गटाकडून मथुराबाई पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तहसीलदारांनी वाळूचे ट्रॅक्टर पकडल्याचे विचारले. या कारणावरून गावातील पंकज जीवराम बडगुजर, राहुल जीवराम बडगुजर, जीवराम दयाराम बडगुजर, दीपाली राहुल बडगुजर आणि शकुंतला जीवराम बडगुजर या सर्व मंडळींनी, भूषण सोमनाथ पाटील यांनी माझा मुलगा प्रकाश सुभाष पाटील, दिलीप सुभाष पाटील आणि पुतणे विजय विकास पाटील व चेतन विकास पाटील तसेच मला शिवीगाळ करीत मारहाण केली. यावरून येथील पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.