एरंडोल येथे पोलीस निवासस्थानांची झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:40+5:302021-09-02T04:36:40+5:30
एरंडोल : शासकीय नोकरी म्हटली की, स्वतःची व्यथा मांडता येत नाही व कथा ही सांगता येत नाही. त्यात पोलीस ...

एरंडोल येथे पोलीस निवासस्थानांची झाली दुरवस्था
एरंडोल : शासकीय नोकरी म्हटली की, स्वतःची व्यथा मांडता येत नाही व कथा ही सांगता येत नाही. त्यात पोलीस खात्यात सेवेत असलेले पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करतात, पण त्यांना ते राहात असलेल्या निवासस्थानाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत एफआयआर नोंदवू शकत नाही, असे वास्तव एरंडोल येथील धरणगाव हायवे चौफुलीलगत असलेल्या पोलीस निवासस्थानाबाबत आहे.
एखादा शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सेवा निवृत्त होईल, इतक्या वर्षांपासूनची एरंडोल येथील पोलीस निवासस्थाने बांधण्यात आलेले आहेत. एकूण २७ निवासस्थाने असून, त्यांची मोठ्या प्रमाणावर दैनावस्था झाले आहे. प्रत्येक निवासस्थानाला असलेल्या स्लॅबला मोठे तडे पडले आहेत. दरवाजाची चौकट भिंतीपासून वेगळी झालेले आहे. दरवाजे बंद केले, तर लवकर उघडत नाहीत व उघडले, तर लवकर बंद होत नाहीत, अशी दुर्दशा दरवाजांची झाले आहे. एरवी एखाद्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी जीवाचे रान करणारे पोलीस कर्मचारी ड्युटी संपल्यावर घरी पोहोचले, तर त्यांच्या कुटुंबीयांना व त्यांना जीव मुठीत घेऊन कोंबडीच्या खुराड्यासारख्या खोल्यांमध्ये राहावे लागत आहे. वेळप्रसंगी स्लॅब कोसळून जीवित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी या प्रकरणी लक्ष घालून पोलिसांना किमान सुरक्षित निवासस्थाने उपलब्ध करून द्यावीत, अशी अपेक्षा आहे. विशेष हे की, दरवर्षी वेळोवेळी स्थानिक पोलीस प्रशासनातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदने देण्यात आलेली असून, त्यांना वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी कधीही या वसाहतीला भेट दिलेली नाही किंवा पाहणी केलेली नाही. अशा स्थितीत तोंड दाबून बुक्क्याचा मार, अशी अवस्था निवासस्थानामध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची झाली आहे.
फोटो ओळ - येथील पोलीस कर्मचाऱ्यांची दुर्दशा झालेली निवासस्थाने.