रावेर : मद्यपी समजून नागमोडी रिक्षा चालवणाऱ्या विषप्राशन केलेल्या चालकाचे जीव वाचवण्यात यश आले आहे. मोटारसायकलचालकाने खबर दिल्याने प्रसंगावधान राखून वाहतूक पोलीस व गृहरक्षक जवानाने घटनास्थळी धाव घेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, सुदैवाने अपघात टळला अन् वेळीच औषधोपचार झाल्याने जीवावरील धोकाही टळला.
रिक्षाद्वारे अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या येथील एका ५५ वर्षीय व्यावसायिकाने काही मानसिक तणावात विष प्राशन करून भोकरीकडून अत्यावस्थेत एखाद्या मद्यपीप्रमाणे नागमोडी रिक्षा चालवत आणत असताना एका सुज्ञ मोटारसायकलस्वाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक पोलिसाला खबर दिली. तेव्हा पो. कॉ. मुकेश सोनवणे व गृहरक्षक दलाचे जवान सुनील तडवी यांनी प्रसंगावधान राखून घटनास्थळी धाव घेत बऱ्हाणपूर रोडवरील हॉटेल मानस गार्डनसमोरून त्या रिक्षाचालकास त्याच रिक्षात मागील आसनात झोपवून थेट रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याने सुदैवाने रस्ता अपघातातून व वेळीच औषधोपचार सुरू झाल्याने त्यांचा जीव वाचला. ही घटना दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास घडली.