ढेरपोटे पोलीस वाढले; अनिश्चित वेळेत कसे राखणार आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:20 IST2021-09-09T04:20:42+5:302021-09-09T04:20:42+5:30

सुनील पाटील जळगाव : जिल्हा पोलीस दलात ढेरपोट्या पोलिसांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. सतत कामाचा ताण, झोप, जेवण ...

Plenty of police grew; How to maintain health indefinitely | ढेरपोटे पोलीस वाढले; अनिश्चित वेळेत कसे राखणार आरोग्य

ढेरपोटे पोलीस वाढले; अनिश्चित वेळेत कसे राखणार आरोग्य

सुनील पाटील

जळगाव : जिल्हा पोलीस दलात ढेरपोट्या पोलिसांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. सतत कामाचा ताण, झोप, जेवण व व्यायाम वेळेवर होत नसल्याचा त्याचा परिणाम पोलिसांच्या शरीरावर होत आहे. दरम्यान, पोलिसांना दरवर्षी सरकारी रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. जे कर्मचारी फिट आहेत, त्यांना शासनाकडून पगारात दरमहा अडीचशे रुपये जास्तीचे देण्यात येतात. जिल्हा पोलीस दलातील ३१९८ पैकी केवळ ९७१ पोलिसांनीच फिटनेस प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यामुळे आज तरी कागदावर फक्त ९७१ पोलीसच फिट असून, बाकीच्यांनी प्रमाणपत्र सादर केलेले नाही.

पोलिसांनी सेवेत असताना फिटनेस राखावा, यासाठीच राज्य सरकारतर्फे तीस वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पोलिसांना विशेष तंदुरुस्ती भत्ता दिला जातो. हा लाभ घ्यावा की नाही, हे ऐच्छिक आहे. शरीराच्या, उंचीच्या प्रमाणात वजन असलेल्या व्यक्तींचा बॉडीमास इंडेक्स (बीएमआय) २५ पेक्षा कमी असतो. तीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि बीएमआय २५ पेक्षा कमी असलेल्या पोलिसांना दरमहा २५० याप्रमाणे तंदुरुस्ती भत्ता दिला जातो. त्यासाठी त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना विभागात तसे प्रमाणपत्र सादर करावे लागते. जिल्हा पोलीस दलाचे सध्याचे मनुष्यबळ ३,१९८ इतके आहे. यंदाच्या तंदुरुस्ती तपासणीत ९७१ पोलीस कर्मचारी तंदुरुस्ती भत्यासाठी पात्र ठरले आहेत.

पोलीस दलामध्ये येणारा प्रत्येक पोलीस सशक्त, फिट व चपळ आहे का, हे तपासण्यासाठी भरतीच्या वेळी मैदानावर प्रत्येक उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येते. जे तंदुरुस्त असतील अशाच कर्मचाऱ्यांना पोलीस दलात सामावून घेतले जाते.

जेवणालाही वेळ मिळत नाही

पोलीस हा ड्यूटीला २४ तास बांधील आहे. त्यामुळे वेळेवर जेवण व व्यायाम होत नाही; परंतु जसा वेळ मिळेल तसा व्यायाम केला, तर अनेक समस्या सुटू शकतात. सर्वांत महत्त्वाचे पोलिसाने निर्व्यसनी असणे आवश्यक आहे. आपले आरोग्य आपल्याच हाती आहे.

-आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार

चांगल्या आरोग्यसाठी किमान एक तास चालणे आवश्यक आहे. शक्यतो वेळेवर जेवण करणे आवश्यक असून, रात्री झोपण्यापूर्वी शक्यतो जेवण करू नये. आहारावर नियंत्रण ठेवले, तर आरोग्य संतुलित राहू शकते. बंदोबस्त, तपास व इतर कामांमुळे पोलिसांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. काही गोष्टींना नाइलाज असतो.

-रामकृष्ण पाटील, हवालदार

कसे राखणार आरोग्य?

पोलिसांची दिनचर्या निश्चित नसते. झोप व जेवणाची वेळ निश्चित नसते. संतुलित आहाराकडे होणारे दुर्लक्ष ही फिटनेस ढासळण्याची प्रमुख कारणे आहेत. पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा पोलीस दलही प्रयत्न करते. त्यासाठी आहारासंदर्भात मार्गदर्शन, योगाभ्यासाचे फायदे, वेळेचे आणि ताणतणावाचे व्यवस्थापन, अशा विषयांवर मार्गदर्शनपर चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. मात्र, बरेचसे कर्मचारी त्यात सहभागी होत नाहीत. त्यामुळे ही समस्या भेडसावते.

फक्त ९७१ जण फिट

पोलीस दलाच्या आस्थापनेवर ३५५१ पदे मंजूर आहेत, तर त्यापैकी ३१९८ पदे कार्यरत आहे. यापैकी फक्त ९७१ जणांनीच फिटनेस प्रमाणपत्र सादर केलेले आहे. काही जणांनी तपासणीच केलेली नाही, तर जे अनफिट असतील त्यांनी प्रमाणपत्रच सादर केलेले नाही. तंदुरुस्त असलेल्या कर्मचाऱ्याला पगारात २५० रुपये वाढवून दिले जातात. ज्यांनी फिटनेस प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांना याचा लाभ मिळत नाही.

कोट...

पोलिसांनी तणावमुक्त असावे. योगा, व्यायाम व संतुलित आहार याचे सूत्र पाळले पाहिजे. पोलिसांसाठी दरवर्षी आहारासंदर्भात मार्गदर्शन, योगाभ्यासाचे फायदे, वेळेचे आणि ताणतणावाचे व्यवस्थापन अशा विषयांवर मार्गदर्शनपर चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. त्याचा लाभ घेतला पाहिजे.

-चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक

Web Title: Plenty of police grew; How to maintain health indefinitely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.