दोन किंवा तीन वेचणीच्या इराद्यानेच कपाशी लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:36+5:302021-06-04T04:14:36+5:30

जितेंद्र पाटील लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या सरासरी उत्पादनात अलीकडील काही वर्षात झालेली घट लक्षात ...

Planting cotton with the intention of selling two or three | दोन किंवा तीन वेचणीच्या इराद्यानेच कपाशी लागवड

दोन किंवा तीन वेचणीच्या इराद्यानेच कपाशी लागवड

जितेंद्र पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या सरासरी उत्पादनात अलीकडील काही वर्षात झालेली घट लक्षात घेता शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीच्या दोन किंवा तीन वेचण्या झाल्यानंतर कपाशीचे पीक लगेच उपटून फेकण्याच्या इराद्यानेच जवळपास सर्व शेतकऱ्यांनी यंदा कपाशी लागवडीसाठी पाऊल उचलले आहे.

गेल्या काही वर्षात सततच्या प्रतिकूल हवामानामुळे कापसाचे उत्पादन घटलेले असतांना, खुल्या बाजारातही अपेक्षित भाव न मिळाल्याने कोरडवाहू व बागायती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे संकटात आणखी वाढ झाल्यानंतर कापसाची शेती तर अक्षरशः आतबट्ट्याची ठरली आहे. अशा या परिस्थितीत यंदा कपाशी लागवडीसाठी सरसावलेल्या शेतकऱ्यांनी थोडी सावध भूमिका घेतली असून, सुरुवातीच्या दोन-तीन वेचण्या झाल्यानंतर शेतातील कापसाचे पीक उपटून त्या जागी रब्बी हंगामात गहू, हरभरा किंवा मका पीक घेण्याचे नियोजन विशेषतः पूर्वहंगामी कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आतापासून करून ठेवले आहे. सुरुवातीच्या वेचण्या झाल्यानंतर नेमका बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कापसाचे पीक जोपासणे खूपच जिकिरीचे ठरते. कीड लागलेल्या कापसाचा दर्जा खराब झाल्याने बाजारात त्यास फार किंमत मिळत नाही. शिवाय कीड लागलेले बोंड वेचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मजुरीचा खर्चही आवाक्याबाहेर जातो. अतोनात मेहनत घेऊनही हाती काही पडत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला येतो. या सर्व गोष्टींचा विचार करता काही शेतकरी फरदड कापसाचे उत्पादन घेण्याऐवजी हिवाळ्यात त्या क्षेत्रात रब्बी पिके घेऊन दोन हंगाम घेण्यात यशस्वी ठरल्याचीही उदाहरणे आहेत.

-----------------

हाच पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून यंदाच्या खरिपात बहुतेक सर्व शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीच्या जुन्या पद्धतीला मूठमाती देऊन बोंडअळीच्या प्रादुर्भावावर मात करण्याची नवी व्यूहरचना आतापासून आखल्याचे निदर्शनास आले आहे. कापसाच्या एकूण उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होऊन शेतकऱ्यांच्या जीवनमानात चांगली सुधारणा होण्याचे संकेत त्यामुळे प्राप्त झाले आहेत.

-----------------

फोटो-

बोंडअळीच्या प्रादुर्भावावर मात करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात कपाशी लागवडीत सावध भूमिका घेतली आहे. (जितेंद्र पाटील)

Web Title: Planting cotton with the intention of selling two or three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.