सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तिसऱ्या लाटेचेही नियोजन पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:58+5:302021-09-05T04:20:58+5:30
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याने जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे, मात्र आगामी सण-उत्सव पाहता प्रशासनाने संपूर्ण तयारी ...

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तिसऱ्या लाटेचेही नियोजन पूर्ण
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याने जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे, मात्र आगामी सण-उत्सव पाहता प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून संभाव्य तिसऱ्या लाटेचेही नियोजन पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. नागरिकांनी गर्दी टाळून उत्सव साजरा केल्यास कोरोनाला आपण लांबू ठेऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गणेशोत्सवापासून सण-उत्सव सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने जिल्ह्यातील कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांविषयी जिल्हाधिकारी राऊत यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्या वेळी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात झालेला हा संवाद.
प्रश्न- सण-उत्सव व संभाव्य तिसरी लाट, याविषयी जिल्ह्यात पुरेशा उपाययोजना आहे का?
उत्तर - शासनाच्या सूचनांप्रमाणे सण-उत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून सहकार्य करण्याची भूमिका दाखविली असून आरोग्यविषयक उपाययोजना पूर्ण आहे. तरीदेखील या काळात उत्साह निश्चितपणे असावा पण गर्दी किंवा बेफिकिरी नको.
प्रश्न- दुसऱ्या लाटेतील अनुभव पाहता बेड व ऑक्सिजनचे वाढीव नियोजन आहे का?
उत्तर - तिसऱ्या लाटेसाठी शासनाने २१ हजार ते २२ हजार ॲक्टिव्ह केसची (दररोज दोन हजारांहून अधिक) शक्यता जिल्ह्यासाठी वर्तविली आहे. दुसऱ्या लाटेत ही संख्या १४ हजार ५०० होती. आता वाढीव संख्येनुसार आयसीयू, ऑक्सिजन व साधारण बेड उपलब्धता याचे नियोजन पूर्ण झाले आहे.
प्रश्न - आवश्यक व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपकरणांची उपलब्धता जिल्ह्यात आहे का?
उत्तर -२१ हजार ते २२ हजार केसेसच्या दृष्टीने उपकरणे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ही संख्या वाढली किंवा इतर जिल्ह्यातील अतिरिक्त रुग्ण आले तरी त्याची तयारीसुद्धा केलेली आहे.