महामार्गावरील खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST2021-09-06T04:21:57+5:302021-09-06T04:21:57+5:30
इन्फो : अग्रवाल चौकात वाहनधारकांची कसरत : आकाशवाणी चौकाकडून अग्रवाल चौकाकडे जाताना आकाशवाणी चौकातच रस्त्याच्या मधोमध जागोजागी चार ते ...

महामार्गावरील खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण
इन्फो :
अग्रवाल चौकात वाहनधारकांची कसरत :
आकाशवाणी चौकाकडून अग्रवाल चौकाकडे जाताना आकाशवाणी चौकातच रस्त्याच्या मधोमध जागोजागी चार ते पाच खड्डे पडलेेले दिसून आले. यापुढे रस्त्यावरून जाताना मार्गात अनेक ठिकाणी लहान-मोेठे खड्डे पडलेले दिसून आले. तर अग्रवाल चौकात रस्त्यात आणि रस्त्याच्या बाजूला लांबीला तीन ते पाच फुटांपर्यंत खड्डे पडलेले दिसून आले. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबून भली मोठी डाब साचली असून, वाहनधारकांना या ठिकाणाहून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे दिवसभर वाहतूक कोंडी उद्भवत आहे. या कोंडीमुळे रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे शाळा-महाविद्यालयाचा हा परिसर असल्याने, विद्यार्थांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
इन्फो :
आयटीआय समोर रस्त्याच्या मधोमध खड्डे :
अग्रवाल चौकाकडून पुढे शिवकॉलनीकडे जाताना आयटीआय समोर रस्त्याच्या मधोमध चार ते पाच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसून आले. पाच ते सहा इंचापर्यंत हे खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून वाहन काढताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी हा रस्ता चांगला असला तरी, शिवकॉलनी रिक्षा थांब्याजवळील चौकातही ठिकठिकाणी खड्डे पडलेले दिसून आले. तसेच काही ठिकाणी रस्ता खचलेला दिसून आले. त्यात खड्ड्यातील दगड-गोटेवर आल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
इन्फो :
साईडपट्ट्या गेल्या खड्ड्यात
आकाशवाणी चौकापासून ते दादावाडीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या खाली पाच ते सहा इंचापर्यंत खाली गेलेल्या दिसून आल्या. रस्त्याच्या खाली साईडपट्ट्या गेल्यामुळे दुचाकी वाहन घसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवकॉलनी जवळ तर रस्त्याच्या साईडपट्टी १० ते १२ इंचापर्यंत खोल गेलेली दिसून आली. यामुळे वाहनधारक या साईडपट्टीचा खड्डा पाहून वाहने संथ गतीने वाहन चालवित असल्याचे दिसून आले. या मार्गावरून दोन्ही बाजूला साईडपट्ट्याची प्रचंड दुरवस्था दिसून आली.
इन्फो :
तर महामार्ग प्रशासनाने खड्डे तरी बुजवावे :
गेल्या दोन वर्षांपासून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, हे सर्वांना माहिती आहे. तसेच या कामामुळेच रस्त्यांची अधिकच दुरवस्था होऊन, अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने चौपदरीकरण होईल तेव्हा होईल, मात्र सध्या स्थितीला महामार्गावरचे खड्डे तरी बुजविणे गरजेचे आहे. मात्र, खड्ड्यांकडे महामार्ग प्रशासनाने आणि शहरातील लोकप्रतिनिधींनी सोयीस्कर दुर्लक्ष केले असल्याचा आरोप शिवकॉलनी परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.