मुख्य रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST2021-09-13T04:16:40+5:302021-09-13T04:16:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध उपनगरांतील, तसेच कॉलन्यांतील अंतर्गत रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे खड्डे ...

मुख्य रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध उपनगरांतील, तसेच कॉलन्यांतील अंतर्गत रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांच्या दुरुस्तीला महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. विविध रस्त्यांवरील खड्ड्यांत खडी, इमल्शन डांबर टाकून दबाई केली जात आहे.
शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. किमान शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याला तरी प्राधान्य देऊन त्वरित नागरिकांना दिलासा द्यावा, यासंदर्भात महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली.
महापालिका प्रशासनातर्फे नेहरू पुतळा परिसर ते रेल्वे स्थानक, तसेच विविध ठिकाणच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविले गेले. शनिवारी (दि.११) स्वातंत्र्य चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालय, आकाशवाणी चौक परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. हे सर्व खड्डे खडी, तसेच इमल्शन डांबर एकत्रित करून रोडरोलरच्या साहायाने दबाई करून बुजविले जात आहेत. प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम संपल्यानंतर पावसाळा संपताच इतर रस्त्यांच्या कामांनाही सुरुवात करण्यात येईल, असे महापौर जयश्री महाजन यांनी कळविले आहे.