मारेकऱ्याजवळ पिस्तूल, तर घटनास्थळावर आढळले काडतूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:13+5:302021-09-23T04:19:13+5:30
खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर धम्मप्रिय मनोहर सुरडकर याच्यावर मंगळवारी सायंकाळी सात वाजता महामार्गावर सुनसगाव पुलाजवळ गोळीबार झाला होता. त्यात ...

मारेकऱ्याजवळ पिस्तूल, तर घटनास्थळावर आढळले काडतूस
खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर धम्मप्रिय मनोहर सुरडकर याच्यावर मंगळवारी सायंकाळी सात वाजता महामार्गावर सुनसगाव पुलाजवळ गोळीबार झाला होता. त्यात तो जागीच ठार, तर चाकू हल्ल्यात त्याचे वडील मनोहर आत्माराम सुरडकर (४५, रा. पंचशील नगर, भुसावळ) गंभीर जखमी झाले होते. पोलिसांना घटनास्थळावर पितळी रंगाचे फायर झालेले एक काडतूसही आढळून आले. त्यावर इंग्रजीत आर ७ असा उल्लेख आहे. रेहानुद्दीन याच्या अंगझडतीत गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी या दोन्ही वस्तू जप्त केल्या आहेत. यात चाकूचाही वापर झाल्याचे मनोहर सुरडकर यांनी म्हटले आहे. मात्र, चाकू पोलिसांना मिळून आलेला नाही. मनोहर सुरडकर यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात खून व आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल झालेला आहे. दोन्ही संशयितांना पहाटे पाच वाजता अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी बुधवारी दुपारी त्यांना न्या. सुवर्णा कुळकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे ॲड. अनिल गायकवाड यांनी बाजू मांडली. यावेळी न्यायालयातही मोठी गर्दी झाली होती.
पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
खून झालेल्या धम्मप्रिय याच्यावर दुपारी पोलीस बंदोबस्तात भुसावळात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी रुग्णालयात प्रचंड गर्दी व पोलिसांचा ताफा होता. भुसावळात आरोपी व मृताच्या घरी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.