खरजईच्या तरुणाकडून पिस्तूल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST2021-09-16T04:22:51+5:302021-09-16T04:22:51+5:30
चाळीसगाव : तालुक्यातील खरजई येथील तरुणाकडून चाळीसगाव शहर पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले ...

खरजईच्या तरुणाकडून पिस्तूल जप्त
चाळीसगाव : तालुक्यातील खरजई येथील तरुणाकडून चाळीसगाव शहर पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. बुधवारी दुपारी सव्वातीन वाजता ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ज्यांच्याकडून हे पिस्तूल विकत घेतले त्या तीन जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .यात दोन जणांना अटक करण्यात केली आहे.
खरजई येथील तरुणांकडे पिस्तूल असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांना मिळाल्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सहायक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांच्यासह पो कॉ. अमोल पाटील, पोना. दीपक पाटील, अमोल भोसले, निलेश पाटील, अशोक मोरे, गणेश कुवर, शरद पाटील यांनी खरजई येथे एका कृषी केंद्राजवळ संशयितरीत्या उभा असलेल्या दीपक गणेश एरंडे (२३) याची चौकशी करून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्तूल आढळले. या पिस्तुलाची किंमत २० हजार पाचशे रूपये इतकी आहे. पोलिसांनी पितळी आवरण व समोरील बाजूस तांब्याची पॉईंट असलेले जिवंत काडतूस ही ताब्यात घेतले. हे पिस्तूल त्याने पवन उर्फ अविनाश रमेश चव्हाण (रा. चाळीसगाव) व भुषण रतन नवगिरे रा. (रिंगरोड, पाटीलवाडा, चाळीसगाव) यांच्याकडून ३० हजार रूपयात विकत घेतल्याची कबुली दिली.
पोलिसांनी भूषण नवगिरे यास पण अटक करून दीपक गणेश एरंडे रा. खरजई व ते पिस्तूल विक्री करणाऱ्या पवन चव्हाण व भूषण नवगिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी हे करीत आहेत.