पिंप्राळानगरीत विठ्ठल नामाचा जयघोष!
By Admin | Updated: July 4, 2017 16:34 IST2017-07-04T16:34:27+5:302017-07-04T16:34:27+5:30
रथोत्सव : दर्शनासाठी अलोट गर्दी : माजी मंत्री सुरेशदादा जैन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती

पिंप्राळानगरीत विठ्ठल नामाचा जयघोष!
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.4- ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ च्या गजरात मंगळवारी शहरातील पिंप्राळा नगरी दुमदुमली.आषाढी एकादशीनिमित्त पिंप्राळा येथील विठ्ठल मंदिर संस्थान आणि वाणी पंचमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. रथोत्सवाचे हे 142 वे वर्ष होते. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. महाआरती झाल्यानंतर वरुणराजाने रथावर जणू जलाभिषेक केला.
मंगळवारी दुपारी 12.30 वाजता माजी मंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तत्पूर्वी, पिंप्राळ्यातील गांधी चौकात मोगरीवाले व रथोत्सवासाठी सहकार्य करणा:या बांधवांचा सत्कार झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, जि.प.महिला व बालकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, मनपा स्थायी समिती सभापती वर्षा खडके, जळगाव पीपल्स बॅँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, माजी उपमहापौर सुनील महाजन, माजी महापौर विष्णु भंगाळे, करीम सालार, नगरसेवक अमर जैन, शोभा बारी, लता मोरे, नरेश खंडेलवाल, वाणी पंच मंडळाचे मोहन वाणी, योगेश वाणी, प्रकाश वाणी, नंदकिशोर वाणी, पंकज वाणी आदी उपस्थित होते.
तत्वत: नव्हे सरसकट पाऊस पडावा-गुलाबराव पाटील
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, गेल्या वर्षाप्रमाणे यंदा ही दमदार पाऊस पडावा, तत्वत: न पडता तो सरसकट पडावा असा टोलाही त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून आमदार सुरेश भोळे यांच्याकडे पाहत हाणला. त्यांच्या वक्तव्याने हशा पिकला.
पांडुरंगाला शेतक:यांची चिंता-सुरेशदादा जैन
सुरेशदादा जैन म्हणाले की, पिंप्राळा रथोत्सवाची पंरपरा शंभरहून अधिक वर्षाची आहे. रथ निघाल्यावर नेहमी पावसाचे आगमन होत असते. पांडुरंगाला शेतक:यांची चिंता असते. यंदाही चांगला पाऊस होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पिंप्राळ्यातील वाणी पंच मंडळ व विठ्ठल मंदिर संस्थानच्या पदाधिका:यांचा सत्कार करण्यात आला.
पावसातही भाविकांचा उत्साह
रथाची आरती झाल्यानंतर काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच रथ ओढणा:या युवकांचा देखील उत्साह वाढला होता. ‘माऊली.माऊली’ च्या गजरातच रथाचे मार्गक्रमण झाले.