पिंप्राळ्यात आगीत २ भावांचा संसार खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 13:10 IST2018-11-07T12:58:19+5:302018-11-07T13:10:15+5:30
दिव्यामुळे लागली आग

पिंप्राळ्यात आगीत २ भावांचा संसार खाक
जळगाव : पिंप्राळा येथील धनगर वाड्यात अशोक विश्राम धनगर व शंकर विश्राम धनगर या दोन्ही भावंडाच्या घराला मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता अचानक आग लागली. घरात सरपण असल्याने क्षणातच दोन्ही भावंडांचा संसार खाक झाला. अशोक याला दुपारीच कामाची मजुरी मिळाली होती तर त्याच्या आईनेही घरात काही रक्कम गोळा करुन ठेवली होती. ती आगीत खाक झाली.
पिंप्राळा येथील धनगर वाड्यात अशोक व शंकर या दोन्ही भावांचे घर शेजारीच आहे. अशोकच्या घरात दिवाळीचा दिवा लावण्यात आला होता. घरात कोणीच नसताना हा दिवा सरपणावर पडला व क्षणातच मोठी आग लागली. आगीचे लोळ पाहताच शेजारच्या घरात असलेली आई मिराबाई, सून व मुलगा शंकर यांनी घराबाहेर धाव घेतली. शेजारील लोकांनी तत्काळ धाव घेत मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग विझविण्यासाठी पत्रेही काढण्यात आली. अग्निशमन दलाचे दोन बंब मागविण्यात आले होते. राजेंद्र सदाशिव पाटील या तरुणाने जीव धोक्यात घालून घरातील गॅस सिलिंडर बाहेर सुरक्षितरित्या हलविले.
आगीच्या धक्क्याने तरुण बेशुध्द
घरात आग लागली व संसार खाक झाल्याचा मोठा धक्का बसल्याने अशोक जागेवरच बेशुध्द पडला. त्याला लोकांनी तातडीने खासगी दवाखान्यात नेले. तेथे उपचार केल्यानंतर तो शुध्दीवर आला. दरम्यान, आगीची माहिती मिळताच माजी नगरसेवक आबा कापसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. आमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळी भेट देवून धनगर कुटुंबाला तातडीची पाच हजाराची तर कापसे यांनी प्रत्येकी दोन हजाराची मदत दिली. नगरसेवक विजय पाटील यांनीदेखील या कुटुंबाला मदत जाहीर केली.