फुलगाव बायपास बनला मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST2021-06-16T04:23:16+5:302021-06-16T04:23:16+5:30
वरणगाव, ता. भुसावळ :येथून जवळच असलेल्या फुलगाव बायपास महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस मागून धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ...

फुलगाव बायपास बनला मृत्यूचा सापळा
वरणगाव, ता. भुसावळ :येथून जवळच असलेल्या फुलगाव बायपास महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस मागून धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या फुलगावच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना १३ रोजी रात्री १० वाजेच्यादरम्यान घडली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक चार ते पाच ता. खोळंबली होती.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत राकेश पांडुरंग चौधरी (२९, रा. फुलगाव) हा भुसावळकडून घराकडे येत असताना त्याच्या दुचाकीला (एमएच १९-डिक्यू ६३९३) अज्ञात वाहनाने मागून जबर धडक दिली . त्याच्या डोक्यास जबर मार बसून अधिक रक्तस्त्राव झाला तसेच पाठीस जबर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याबाबत अरविंद नारायण कुरकुरे (रा. भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध वरणगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संदीप कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मनोहर पाटील व अतुल कुमावत करीत आहेत.
समांतर रस्ता करण्याची मागणी
या ठिकाणापासून अगदी हाकेच्या अंतरावर काही दिवसांपूर्वी तळवेल येथील तीन एकुलत्या तरुणांचा भुसावळकडून घरी तळवेल येथे जात असतांना अपघाती मृत्यू झाला होता. फुलगाव जवळील बायपास जणू काही मृत्यूचा सापळा बनलेला आहे. एका महिन्याच्या अंतरात चौघांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. त्यामुळे फुलगाव व वरणगावकडे जाण्यासाठी महामार्गाला लागून समांतर रस्ता तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.