माजी मंत्री एकनाथराव खडसेंचाही फोन टॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:35 IST2020-02-06T00:33:46+5:302020-02-06T00:35:55+5:30
माझेच काय कोणाचेही फोन टॅप होणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली.

माजी मंत्री एकनाथराव खडसेंचाही फोन टॅप
मुक्ताईनगर, जि.जळगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅप झाल्याप्रकरणी चौकशी सुरू असताना भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा फोनदेखील टॅप झाल्याचा प्रकार उघडकीस असल्याचा दावा वजा वृत्त दोन इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार दुर्दैवी असून, माझेच काय कोणाचेही फोन टॅप होणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी नवी दिल्लीतून ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
माजी मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांसह विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याच्या तक्रारी होत्या. या अनुषंगाने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने या प्रकरणात चौकशी कामी उच पदस्थ अधिकाऱ्यांच्या द्वि सदस्य चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी करून सहा आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले आहे. फोन ट्ॅपिंग प्रकरणात चौकशी सुरू असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात विरोधी पक्ष नेत्यांसह चक्क स्वपक्षीय नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचेदेखील फोन टॅप केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, असे वृत्त इंग्रजी दैनिकात आले आहे.
भाजप पक्षातील तत्कालीन सत्ताधाऱ्यांची अंदरकी बात बाहेर आली आहे आणि मोठी खळबळ उडाली आहे.
फोन टॅप झाले असेल तर दुर्दैवी आहे. हे मी इंग्रजी वृत्तपत्रात वाचले. मला तर तसे वाटत नाही, माझेच काय कोणाचेही फोन टॅप होणे योग्य नाही. नैतिकतेला धरून नाही. असे व्हायला नको पाहिजे होतं. त्यातल्या त्यात मी तर पार्टीचा माणूस आहे. आपल्याच माणसाचे फोन टॅप केले गेले असतील तर दुर्दैवी आहे.
-एकनाथराव खडसे, माजी मंत्री