आमडदे येथील पाळलेला पोपट करतोय मोटारसायकलवर प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:18+5:302021-07-29T04:16:18+5:30
भडगाव : पोपट पाळल्याचे आपण काही घरांवर पाहतो. पोपट पिंजऱ्यात राहतो. रोज मिठू मिठू बोलतो. शिट्ट्या वाजवितो. मात्र, भडगाव ...

आमडदे येथील पाळलेला पोपट करतोय मोटारसायकलवर प्रवास
भडगाव : पोपट पाळल्याचे आपण काही घरांवर पाहतो. पोपट पिंजऱ्यात राहतो. रोज मिठू मिठू बोलतो. शिट्ट्या वाजवितो. मात्र, भडगाव तालुक्यातील आमडदे येथील अशोक माणिक भिल्ल या तरुणाने घरी पाळलेल्या पोपटाच्या लहान पिल्लाची मालकासोबत राहण्याची अजब कहाणीच बनू पाहत आहे. हा पोपट आताशी मिठू मिठू बोलायला शिकतोय. परिवारासोबत राहून उघड्यावर फिरून घरी येतो. अशोक भिल्ल यांच्या अंगाखांद्यावरही बसतो. एवढेच नाही, तर मोटारसायकलवर बसून प्रवासही करतो.
आमडदे येथील अशोक माणिक भिल्ल या परिवाराने पोपट पाळला आहे. अशोक भिल्ल यांचा लहान मुलगा प्रवीण भिल्ल याने या आंब्यांच्या सिझनमध्ये शेतात एका नारळाच्या झाडाच्या हिरवळीत दडलेल्या खोप्यामधून हे पोपटाचे पिलू आणून घरी पाळले आहे. या परिवारात हा पोपट जीवाभावाचा सोबती होऊन अंगाखांद्यावर खेळत आहे. या पोपटाचे नाव ‘रघू’ असे ठेवण्यात आले आहे. या पोपटाला ‘रघू’ म्हणून प्रेमाने हाक मारताच, उडत परिवारातील सदस्यांकडे धावत येतो. रघू लहान असल्याने आताशी मिठू मिठू बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे, या रघूला रात्रीच फक्त मांजरी, कुत्रा यांच्या धाकाने पिंजऱ्यात ठेवण्यात येते. मात्र, दिवसभर हा रघू घरात उघड्यावर वावरतो. गावात परिसरात हिरवळीच्या माळरान, झाडांवर बसून आनंदाने आकाशी उडून घरी न चुकता वापसही येतो.
या रघू पोपटाला हा परिवार घरातील सदस्याप्रमाणे जीव लावतात. रघूला मिरची, शेंगा, डाळिंब आदी फळेही रोज खाऊ घालतात. एवढेच नव्हे, अशोक भिल्ल हे जर बाहेरगावी मोटारसायकलवर कामानिमित्त गेले, तर हा रघू पोपटही त्यांचेसोबत मोटारसायकलवर बसून प्रवास करतो. ज्या ठिकाणी ते थांबतात व फिरतात, त्यावेळी हा रघू त्यांचे खांद्यावर बसून राहतो. असा प्रसंग दि. २६ रोजी भडगाव तहसील कार्यालयात कामानिमित्त आल्यावर नागरिकांनी पाहिला. हा पोपट अशोक भिल्ल या तरुणाच्या अंगाखांद्यावर बसलेला तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसून आला. आमडदे येथून भडगावी येताना व भडगावहून आमडदे येथे घरी जाताना, हा पोपट त्यांच्या मोटारसायकलीवर बसून प्रवासाचा आनंद लुटताना दिसून आला.
280721\28jal_2_28072021_12.jpg
भडगाव तहसिल कार्यालयासमोरुन अशोक भिल्ल मोटारसायकलवर जाताना पोपट बसलेला दिसत आहे.