दुसऱ्यासाठी जगणारी माणसे कधीच मरत नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST2021-07-27T04:18:20+5:302021-07-27T04:18:20+5:30
अमळनेर : जी माणसे स्वतःसाठी जगतात ती जिवंत असूनही मेलेली असतात आणि जी माणसे दुसऱ्यासाठी जगतात ती कधीच मरत ...

दुसऱ्यासाठी जगणारी माणसे कधीच मरत नाहीत
अमळनेर : जी माणसे स्वतःसाठी जगतात ती जिवंत असूनही मेलेली असतात आणि जी माणसे दुसऱ्यासाठी जगतात ती कधीच मरत नाहीत, असे प्रतिपादन हभप निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराजांनी अमळनेर येथील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल शाळेच्या प्रांगणात आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात केले.
जीवनाला धार्मिकतेची जोड देताना इंदुरीकर महाराजांनी प्रत्येकाने प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी एक झाड लावावे. तर शेतकऱ्यांनी आहे त्यापेक्षा कमी शेती करावी. मात्र शेतात शेततळे अवश्य उभारावे त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असे आवाहनही केले. जीवनात मोठेपणा येण्यासाठी यातना भोगाव्या लागतात, समाजाचे आघात सहन करण्याची ताकद पाहिजे. जे दगड घाव सहन करतात तेच मूर्ती होतात. कोरोनाच्या काळाबद्दल बोलताना ते म्हणाले की दीड वर्षात लोकांना चांगले ऐकायला मिळाले नाही म्हणून ते बधिर झाले आहेत. जगाला सुखी करण्याची ताकद संत संगतीत आहे. सगळे जग तज्ज्ञ आहे पण देव सर्वज्ञ आहे. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, ॲड. ललिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार स्मिता वाघ, संचालक प्रा. श्याम पाटील,पराग पाटील, वेदश्री पाटील,माजी सभापती प्रफुल पाटील,पं.स.चे माजी सभापती श्याम अहिरे, जि.प. सदस्या संगीता भिल, शीतल देशमुख, हिरालाल पाटील, व्यासपीठावर हजर होते. ॲड. ललिता पाटील यांनी इंदुरीकर महाराज यांचा सत्कार केला. कीर्तनास उमेश वाल्हे, जयवंतराव पाटील, विक्रांत पाटील, कल्याण पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक व महिलांची उपस्थिती होती.
इंदुरीकर महाराज कीर्तन करताना व इंदुरीकर महाराज यांचा सत्कार करताना ॲड. ललिता पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील व इतर छाया अंबिका.