पिक खराब होऊन आवक घटल्याने शेंगदाणा वधारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST2021-02-05T05:54:39+5:302021-02-05T05:54:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अवकाळी पावसामुळे इतर पिकांसह शेंगदाण्याच्याही पिकाला फटका बसल्याने त्याची आवक घटली असून त्यांचे भाव ...

पिक खराब होऊन आवक घटल्याने शेंगदाणा वधारला
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अवकाळी पावसामुळे इतर पिकांसह शेंगदाण्याच्याही पिकाला फटका बसल्याने त्याची आवक घटली असून त्यांचे भाव वाढू लागले आहे. आठवडाभरात शेंगदाण्याचे भाव २० रुपये प्रति किलोने वाढून ते १४० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. इतर किराणा मालाचे भाव मात्र स्थिर असून खाद्य तेलामध्ये चढ-उतार सुरू आहे.
गेल्या महिन्यापासून भाववाढ झालेल्या खाद्य तेलाच्या भावात गेल्या आठवड्यात घसरण झाली होती. त्यामुळे सोयाबीन तेलाचे भाव १२५ ते १३० रुपयांवरून ११२ ते ११५ रुपयांवर आले होते. मात्र दोन-तीन दिवसात हे भाव कमी जास्त होत असून तेल आता पुन्हा ११८ रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते पुन्हा १५० ते १५५ रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. कर्नाटक राज्यातून होणारी शेंगदाण्याची आवक थांबल्याने त्याचेही भाव वाढले आहे.
इतर किराणा माल स्थिर
खाद्य तेलात चढ-उतार तर शेंगदाण्यात भाववाढ झाली असली तरी इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहे. साखर अजूनही ३६ रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. तसेच बेसणपीठ ८५ ते ९० रुपये, रवा व मैदा ३५ ते ४० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.
कोथिंबीर पुन्हा स्वस्त
गेल्या काही दिवसांपासून हिरवे पालेभाज्या स्वस्त होत असून कोथिंबीर तर पाच रुपये प्रति जुडीने विक्री होत आहे. मेथीची भाजीदेखील ५ रुपये जुडीवर आली आहे.
टमाटे वधारले
गेल्या दोन आठवड्यांपासून टमाट्याचे भाव कमी झाले होते. गेल्या आठवड्यात तर टमाटे १० रुपये प्रति किलोवर आले होते. या आठवड्यात यात काहीसी वाढ होऊन टमाटे १५ रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. बटाटे ३० रुपये प्रति किलोवर आहे.
खाद्य तेलाचे भाव सतत कमी अधिक होत आहे. तसेच शेंगदाण्याच्या भावात चांगलीच वाढ झाल्याने खिशाला चांगलीच झळ बसत आहे.
- योगेश कोळी, ग्राहक
शेंगदाण्याची आवक कमी झाल्याने त्याचे भाव चांगलेच वाढले आहे. तसेच खाद्य तेलाच्या भावात चढ-उतार सुरू आहे.
- प्रवीण पगारिया,
व्यापारी
पालेभाज्यांचे भाव कमी झाले असून कोथिंबीर व मेथीची भाजी पाच रुपये प्रति जुडीवर आली आहे.
-रामकृष्ण चौधरी, भाजीपाला विक्रेते