सोमवारपर्यंत नुकसानभरपाईसह थकीत भाड्याची रक्कम भरा, अन्यथा गाळे होणार सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST2021-03-04T04:29:08+5:302021-03-04T04:29:08+5:30
उपायुक्तांचा गाळेधारकांना अंतिम इशारा : प्रत्यक्ष मार्केटमध्ये जाऊन दिल्या सूचना लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मुदत संपलेल्या मार्केटमधील ...

सोमवारपर्यंत नुकसानभरपाईसह थकीत भाड्याची रक्कम भरा, अन्यथा गाळे होणार सील
उपायुक्तांचा गाळेधारकांना अंतिम इशारा : प्रत्यक्ष मार्केटमध्ये जाऊन दिल्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत आता मनपा प्रशासनाने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या असून, बुधवारी मनपा उपायुक्त प्रशांत पाटील व संतोष वाहुळे यांच्या पथकाने फुले मार्केट, चौबे, बी.जे. व धर्मशाळा मार्केटच्या ठिकाणी जाऊन गाळेधारकांना सोमवारपर्यंत थकीत भाड्याची रक्कम नुकसानभरपाईच्या रकमेसह भरण्याचा सूचना दिल्या आहेत. ही रक्कम सोमवारपर्यंत न भरल्यास गाळे सील करण्यात येणार असल्याचा इशाराच उपायुक्तांनी दिला आहे.
मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत आता मनपा प्रशासनाने कडक निर्णय घेण्याची तयारीच केली आहे. मनपाच्या महासभेपुढे गाळे थेट ताब्यात घेऊन लिलाव करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाकडून सादर करण्यात आला होता. सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव थांबविल्यानंतर प्रशासनाने आता सत्ताधाऱ्यांचा किंवा महासभेच्या भरवशावर न बसता आपल्या पद्धतीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतानाही, आयुक्तांनी गाळेभाडे भरा, अन्यथा मनपाकडून कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या आहेत, तसेच शासनाच्या कोणत्याही निर्णयासाठी आता महापालिका प्रशासन थांबणार नसल्याचेही संकेत आता मनपा प्रशासनाने दिले आहेत.
मूलभूत सुविधांसाठी निधी नसल्याने होणार कारवाई
शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास मनपाकडे पुरेसा निधी नाही. त्यातच शहरात रस्त्यांची समस्यादेखील वाढत आहे. मनपाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये ७० टक्के तक्रारी या धूळ व रस्त्यांचा तक्रारी असतात. यामुळे सत्ताधाऱ्यांकडून शहरातील रस्त्यांचा कामांसाठी मनपा फंडातून तरतूद करण्यात आली आहे. हा निधी मनपाकडे नसल्याने आता गाळेधारकांकडून वसूल करून, शहराच्या समस्या मार्गी लावण्याचा विचार मनपा प्रशासनाने केला आहे.
मोठ्या थकबाकीदारांना दिल्या सूचना
मनपा उपायुक्त प्रशांत पाटील व संतोष वाहुळे यांनी बुधवारी दुपारी १२ वाजता महात्मा फुले, बी.जे. चौबे यांनी मार्केटमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान मोठ्या थकबाकीदारांना थेट भेटून त्वरित थकबाकीची रक्कम भरण्याचा सूचना दिल्या आहेत, तसेच ही रक्कम न भरल्यास सोमवारी थेट गाळे सील करण्यात येतील, असा इशारा उपायुक्तांनी दिल्या.
३०० कोटींची थकबाकी, नुकसानभरपाईच्या दिल्या नोटिसा
मनपा प्रशासनाकडून आतापर्यंत २३०० हून गाळेधारकांना नुकसानभरपाईच्या नोटिसा बजावल्या असून, तब्बल ३०० कोटींची थकबाकी गाळेधारकांकडे थकली आहे, तसेच गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्यासाठी आता शेवटच्या चार दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, यासाठी शनिवार व रविवारीदेखील मनपाचा वसुली विभाग सुरू राहणार आहे. दरम्यान, नुकसानभरपाईच्या नोटिसा बजावून तीन महिने होऊनही गाळेधारकांनी थकीत भाडे भरले नाही.