पाटणा परिसर, गौताळा अभयारण्य पर्यटकांसाठी ‘लॉक’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST2021-06-16T04:22:40+5:302021-06-16T04:22:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता दोन महिन्यांपासून राज्यभरातील अभयारण्ये पर्यटनासाठी बंद करण्यात आले होते. ...

पाटणा परिसर, गौताळा अभयारण्य पर्यटकांसाठी ‘लॉक’च
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता दोन महिन्यांपासून राज्यभरातील अभयारण्ये पर्यटनासाठी बंद करण्यात आले होते. ‘ब्रेक द चेन’चे निर्बंध शिथिल होऊनही अद्याप चाळीसगाव तालुक्यातील गौताळा अभयारण्यासह पाटण्याचा परिसर अजूनही लॉकच आहे. निसर्गाच्या सौंदर्याने बहरलेला पाटणादेवीचा परिसर व गौताळा अभयारण्याचा परिसर पर्यटकांना खुणावतो आहे. चाळीसगाव तालुक्याचे पर्यटन वैभव असलेल्या गौताळा अभयारण्य हिरवेगार आहे. जवळच असलेला धवलतीर्थ धबधबा ओसांडून वाहत आहे. दरवर्षी पर्यटक, भाविक येथील निसर्गाचा सुखद अनुभव घेण्यासाठी गर्दी करतात. मात्र यंदा कोरोनाने पर्यटक तसेच भाविकांच्या वन सफारीवर अक्षरश: पाणी ओतले गेले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक फैलावू नये, यासाठी पाटणासह गौताळाचे दर्शन दुरापास्त झाले आहे. निसर्गरम्य गौताळा परिसराचे नयनरम्य सुख डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकप्रेमींचे पाय लागतात. मात्र अडीच महिन्यापासून हा परिसर सुनासुना आहे.
खान्देशचा लोणावळा म्हणून पाटणा देवीचा निसर्गरम्य परिसर प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात व औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गौताळा औट्रमघाट अभयारण्य दोनशे साठ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. या अभयारण्यात बिबट्या, काळवीट, नीलगार, साराळ असे असंख्य प्राणी प्रामुख्याने आढळतात. तसेच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती, वनसंपदा येथे आहे. हे अभयारण्य जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय संपन्न असे आहे.
पाटणादेवी, केदारकुंड धबधबासह वन्यजीव हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. विशेषतः शनिवारी, रविवारी येथे अधिक पर्यटकांची गर्दी होत असते. पाटणादेवी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. चाळीसगाव शहरापासून अवघ्या १८ किमी अंतरावर नैऋत्येला असणारे हे शक्तिपीठ निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. वर्षभर येथे भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीच्या पर्वणीवर अलोट गर्दी होते. निसर्गाच्या सान्निध्यात आदिशक्तीचा जागर मनात साठविण्यासाठी परराज्यातूनही भाविक येथे आवर्जून हजेरी लावतात. पाटणादेवीच्या या मंदिरात आदिशक्ती चंडिकादेवीची मूर्ती आहे.
वनखात्याने मंदिराजवळच भास्कराचार्य निसर्ग केंद्र उभारले आहे. पाटणादेवीच्या आसपास कन्हेरगड, पितळखोरे लेणी, हेमाडपंती महादेव मंदिर, सीता न्हाणी नामक लेणे, शृंगारचौरी लेणी, धवलतीर्थ धबधबा, जैनांची नागार्जुन लेणी आणि गौताळा अभयारण्य आहे. पावसाळ्यात पाटणा परिसर हिरवी चादरच पांघरतो. हे अनोखे रूप पाहण्यासाठी पर्यटकांचे पाय आपसुकच पाटणाकडे वळतात. पर्यटकांमुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. मात्र हा रोजगारही हिरावला गेला आहे.
कोरोनाचे पर्यटनावर ग्रहण-
कोरोनाने देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्याचा फटका गौताळा व पाटणादेवीलाही बसला आहे. दरवर्षी लाखो भाविक पाटण्याला भेट देतात. मात्र अडीच महिन्यापासून पर्यटकांना तसेच भाविकांना गौताळासह पाटणादेवी दर्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांसह भाविकांचा मोठा हिरमोड झाला आहे. पावसाळ्यात तर गौताळ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. खान्देशचे जणू लोणावळच भासते. बहरलेले वृक्ष राजी पाहताना पर्यटक अक्षरश: हरखूून जातो. डोंगरदऱ्यांमधून खळखळणारे पाण्याचे झरे पाहताना चेहऱ्यावर असलेली निराशा हटून काही क्षणासाठीही का होईना, माणूस निसर्गाच्या सान्निध्यात खुलून जातो. मात्र कोरोनाने हा आनंदही हिरावून नेला आहे. खान्देशच्या लोणावळ्याला पर्यटकांची आस लागली आहे, हे पर्यटक क्षेत्र लवकरच खुले करावे अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त होत आहे.
===Photopath===
150621\15jal_5_15062021_12.jpg~150621\15jal_6_15062021_12.jpg
===Caption===
पाटणा परीसर व गौताळा अभयारण्य पर्यटकांसाठी ‘लॉक’च~पाटणा परीसर व गौताळा अभयारण्य पर्यटकांसाठी ‘लॉक’च