रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडून रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 22:33 IST2020-08-26T22:32:32+5:302020-08-26T22:33:28+5:30

चालकाला मारहाण :संतप्त नातेवाईकांकडून गाडीची तोडफोड

Patient dies after ambulance crashes into road | रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडून रुग्णाचा मृत्यू

रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडून रुग्णाचा मृत्यू


कुरंगी, ता. पाचोरा : रुग्णाला जळगाव येथे घेऊन जात असताना रस्त्यातच सामनेरच्या पुढे रुग्णवाहिका बंद पडल्याने त्या गाडीत असलेल्या रुग्णाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांनी संतप्त होऊन रुग्णवाहिकेची तोडफोड केल्याची घटना २६ रोजी सकाळी घडली.
याबाबत वृत्त असे की, पाचोरा येथून रुग्णाला जळगाव येथे घेऊन जात असलेली रुग्णवाहिका सामनेर गावाच्या पुढे व पाथरी जवळ सकाळी साडेनऊ ते दहा वाजे दरम्यान बंद पडली. गाडीमध्ये असलेल्या रुग्णाला जास्त त्रास जाणवत असल्याने त्याचा त्याठिकाणी जागीच मृत्यू झाल्याने गाडीतील संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेची तोडफोड करून चालकाला मारहाण केली. कुºहाड तालुका पाचोरा येथील रुग्ण दामू श्रावण पवार (६०) हे पाचोरा येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल होते. त्यांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना जळगावला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर पाचोरा येथून जळगाव घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णवाहिकेला (एमएच ०५ /आर ०६६१) फोनवरून बोलविले. रुग्णास जळगाव कडेनेत असताना ही घटना घडली. या घटनेबाबत म्हसावद पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान गुरुवारी झालेल्या घटनेतील रुग्णवाहिकेचा परवाना आहे का ? याबाबत पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
खिशातून पैसे काढल्याचा चालकाचा आरोप
रुग्णवाहिकेची घटनास्थळी तोडफोड केली तर चालकाला मारहाण करून त्यांच्या खिशातून सहा हजार रुपये काढून गाडीची चावी काढून घेतली व गाडीमध्ये असलेली आॅक्सिजन हंडीही सोबत घेऊन गेल्याचे गाडी मालक भागवत पाटील (पाचोरा) यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
 

Web Title: Patient dies after ambulance crashes into road